
लेखक:- डॉ.गोरखनाथ सुकदेव देवरे
रिटायर्ड मेडिकल ॴॅफिसर ,स्वामी विवेकानंद नगर,येवला रोड, नांदगाव जि.नाशिक

॥आत्मा मालिक॥ गुरु ओम् गुरु ओम्॥ हरिपाठ चिंतन अभंग १९-
वेदशास्त्रपुराण श्रुतिचे वचन । एक नारायण सार जप ॥१॥
जप तप कर्म हरिविण धर्म । वाउगाचि श्रम व्यर्थ जाय ॥२॥
हरिपाठीं गेले ते निवांतचि ठेले । भ्रमर गुंतले सुमनकळिके ॥३॥
ज्ञानदेवां मंत्र हरिनामाचे शस्त्र । यमें कुळगोत्र वर्जियेले ॥४॥
आलोड्य सर्व शास्राणि विचार्य च पुन: पुन:। इदमेकं सुनिष्पन्नं ध्येयो नारायणो हरि:॥ शुकाचार्य पुराण॥ सर्व शास्रांचा पुन्हा पुन्हा अभ्यास व चिंतन केले असता एकच निष्पन्न होते कि, नारायणाचे, ईश्वराचे ध्यान करावे।वेद, शास्र, पुराण, श्रुति या सर्वांचे प्रमाण आहे की सर्व ग्रंथांचा एकमेव सार आहे, नारायण नावाचा जप करणे। नारायण हे देवाचेच एक नाव आहे।
जप तप कर्म हरिविण धर्म । वाउगाचि श्रम व्यर्थ जाय ॥२॥ नारायण नामजप सोडून इतर जप तप कर्म धर्मादि साधनांचे आचरण केले तर तो केवळ व्यर्थ श्रम आहे। इतर हठयोगादि मार्गात खूप कष्ट आहेत, नामजपात काही कष्ट नाहीत, सहज होते।
हरिपाठीं गेले ते निवांतचि ठेले । भ्रमर गुंतले सुमनकळिके- भुंगा जसा एखाद्या फुलातील मकरंद सेवनात सहज तल्लीन होतो, त्याला स्वत:चाही विसर पडतो, त्याप्रंमाणे हरिनामात मग्न झालेल्या पुरुषांची अवस्था होते। हरिपाठात जाणे म्हणजे हरिनामात तल्लीन होणे। हरिस्मरणात भक्त तल्लीन होतो, निवांत होतो। निश्चिंत होतो।एकदा ईश्वरावर दृढ निश्चय ठेवला की कसलीही चिंता करण्याचे कारण नसते, ईश्वर त्या भक्ताची सर्व काळजी घेतो। मुक्तानंद बाबा म्हणतात, “चिंता छोडो। चिंतन करो।” चिंता सोडून द्या, व ईश्वर चिंतन करा।
ज्ञानदेवां मंत्र हरिनामाचे शस्त्र । यमें कुळगोत्र वर्जियेले- या हरिनामाच्या शस्रापुढे इतरांचे काय पण यमाचे देखील काही चालत नाही। तो हरिभक्ताच्या कुळगोत्राकडे ही पाहू शकत नाही, पहात नाही। ध्यानाच्या उच्च अवस्थेत मृत्युला प्रवेश नाही। काळाचा रिघ लागत नाही, अखंड आनंदाचा तो प्रांत आहे। ईश्वरभक्तावर काळाची ही सत्ता चालत नाही। आणि विशेष म्हणजे ईश्वराचे नामजप करणे, नामसंकीर्तन करणे अगदी सोपेसाधन असून अत्यंत प्रभावी साधन आहे।
