
लेखक:- डॉ.गोरखनाथ सुकदेव देवरे
रिटायर्ड मेडिकल ॴॅफिसर ,स्वामी विवेकानंद नगर,येवला रोड, नांदगाव जि.नाशिक

॥आत्मा मालिक गुरु ओम् गुरु ओम्॥ हरिपाठ चिंतन अभंग क्र-१८
हरिवंशपुराण हरिनाम कीर्तन । हरिविण सौजन्य नेणें कांहीं ॥१॥
त्या नरा लाधलें वैकुंठ जोडलें । सकळ घडलें तीर्थाटन ॥२॥
मनोमार्गें गेला तो तेथे मुकला । हरिपाठीं स्थिरावला तोचि धन्य ॥३॥
ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी । रामकृष्णीं आवडी सर्वकाळ ॥४॥ हरिवंश पुराण, हरिनाम संकिर्तन, याशिवाय जो इतर काही जानत नाही, म्हणजे ज्याची या वर दृढ श्रध्दा आहे, व हरीशिवाय दुसर्या कोणाच्या ठिकाणी लक्ष लावत नाही, ज्याची हरीवर एकनिष्ठ भक्ती आहे, त्यालाच वैकुण्ठलोक किंवा परमेश्वर मिळाला, त्याला सर्व तीर्थयात्रा न करता ही सर्व तीर्थयात्रा केल्याचे फळ मिळाले असे समजावे।
तुका म्हणे त्यांनी केली वैकुंठ मेदिनी॥१॥ त्या भक्तांनी हरिनाम संकीर्तन करुन पृथ्वीच वैकुंठ केली। वैकुंठाला जाण्याची गरजच नाही। वैकुंठच त्यांचेकडे येते। “कही एखादेनि वैकुण्ठा जावे। ते तिही वैकुंठचि केले आघवे।ऐसे नामघोषगौरवे धवळले विश्व॥ ज्ञानेश्वरी-९-२०३॥
ते न घेती वैकुंठाची वाट। त्यांचे घरचि मी करी वैकुंठ। तेथे चिन्मात्रे फुटे पहाट। पिके पेठ संतांची॥नाथ भागवत-२४-३४४॥ उपनिषदे येती तयापासी। स्वधर्म ये सुखवस्तीसी। नारदादि सनकांदिकांसी। तया घरासी अतिप्रीती॥२४-३४५॥ अशा पुरुषास सर्व तीर्थाटणे कोठेही न जाता आपोआप घडतात।
मनोमार्गें गेला तो तेथे मुकला । हरिपाठीं स्थिरावला तोचि धन्य- मनोमार्गे म्हणजे आपल्या मनाला वाटेल त्या मार्गाने जाणे, मनाला वातेल तसे करणे। असा मनुष्य शास्र, संत, देव वगैरे काही मानत नाही, आणि मानलेच तर आपल्या मनाला वाटेल तशी भक्ती करतो, त्यामुळे त्याचा मार्ग चुकतो व तो भलतीकडे भरकटतो, त्याचे नुकसान होते। परंतु जो हरिपाठात स्थिर झाला, संतांनी सांगीतल्या प्रमाणे अध्यात्मात योग्य प्रकारे मार्गक्रमण करतो तो मात्र मार्ग चुकत नाही, तोच धन्य आहे।
मना आला तैसा करिती विचार। म्हणती संसार नाही पुन्हा॥१॥ चार्वाक नास्तिक मताबद्दल यापूर्वी विवेचन केले गेले आहे। अनेक जन्मांच्या संस्कारामुळे मनाला विषया बद्दल ओढ असते, विषयासक्ती हीच मनाची आवड, त्यानुसार मन तिकडे जाते। अनादिकालापासून मन याच मार्गाने जात असते। या मार्गाने जाण्यात जीवांचा सर्वनाश आहे, आपले खरे हीत कशात आहे ते कळत नाही।
ध्यायतो विषयान्पुंसः संगस्तेषूपजायते। संगात्संजायते कामः कामात्क्रोधोऽभिजायते।।२-६२।। क्रोधात्भवति संमोहः संमोहात्स्मृतिविभ्रमः। स्मृतिभ्रंशाद् बुध्दिनाशो बुध्दिनाशात्प्रणश्यति।।२-६३।। मनोमार्गे गेल्यामुळे कसे नुकसान होते त्याचा क्रम भगचद्गीतेच्या या श्लोकात दिला आहे। जीव विषयांचे चिंतन करतो, एखाद्या गोष्टीवे चिंतन करतो तेव्हा त्याला त्या विषयाची आसक्ती उत्पन्न होते। संग आसक्तीमुळे त्याची ईच्छा अधिकच वाढते। जर ती ईच्छा पूर्ण झाली तर लोभ वाढतो व जर ती ईच्छा पुर्ण झाली नाही तर क्रोध उत्पन्न होतो। क्रोधामुळे संमोह भ्रम बुध्दीभ्रम उत्पन्न होतो। संमोहामुळे स्मृतिभ्रम होतो, व बुध्दीभ्रंश झाल्यामुळे सर्वनाश होतो। जो हरिपाठात हरिभक्तीत स्थिर झाला तो मात्र ईश्वरप्राप्ती करतो। त्याच्या जीवनाचे सार्थक होते।
ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी । रामकृष्णीं आवडी सर्वकाळ- ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मला हरिनामाची गोडी लागली आहे। व सर्व काळ रामकृष्ण स्वरुपाचीच आवड आहे।
[11-01-2023]
