
लेखक:- समिर गायकवाड
राजू बाविस्कर हे उत्तम चित्रकार आहेत पण त्याहून अधिक एक संवेदनशील सह्रदयी मानवतावादी व्यक्ती आहेत. ‘काळ्या निळ्या रेषा‘ हे त्यांचे आत्मकथन. 2025 या पुस्तकाला सालचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. वात्सल्यभाव ठायी असणारा चित्रकार त्याच्या संघर्षमय आयुष्याला जेव्हा शब्दबद्ध करतो तेव्हा त्याचंही एक देखणं चित्र होऊन जातं.
राजू बाविस्कर यांचे ‘काळ्या निळ्या रेषा’ हे आत्मकथन केवळ एका चित्रकाराचे वैयक्तिक कथन नव्हे, तर खानदेशातील ग्रामीण जीवनाच्या वेदनांना कॅनव्हासवर उमटवणारे एक जिवंत चित्र आहे. 2022 मध्ये राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलेले हे पुस्तक मराठी आत्मकथन परंपरेत एका नव्या पर्वाची नांदी दर्शवते. जगाने मागास ठरवलेल्या मातंग समाजात जन्मलेल्या बाविस्करांनी आपल्या जीवनप्रवासातून गरिबी, जातिवाद आणि कलेने निर्माण केलेल्या स्वाभिमानाचे चित्र यात रेखाटलेय. हे आत्मकथन केवळ व्यक्तिगत यशोगाथा नाही, तर समाजातील वंचित वर्गाच्या अस्वस्थतेला स्पर्श करणारा एक सचेत दस्तऐवज आहे.
बाविस्करांचा जन्म खानदेशातील जळगाव जिल्ह्यातील एका संगीतिक कुटुंबात झाला. वडील बँडमध्ये ट्रम्पेट वाजवत, तर लहानपणी ‘भूऱ्या’ या टोपणनावाने ओळखले जाणारे बाविस्कर स्वतः बँड कलावंत म्हणून वाढले. बालपणी शिक्षण सोडण्याचा प्रसंग आला, तरी ‘जाडया रड्या’ सारख्या पात्रांच्या प्रेरणेने ते पुन्हा शाळेत परतले. गरिबी, कुटुंबातील छळ, गहाणवट ठेवणे, बँड विकत घेणे अशा संघर्षांतून त्यांचा प्रवास होत राहिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रभावित होऊन त्यांनी शिक्षण घेतले, ते क्लॅरिनेट वाजवायला शिकले, त्यांनी स्वतःचा स्पिकर बँड उभारला आणि या दरम्यानच एक अवलिया चित्रकार म्हणून ते आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले. दिल्लीच्या ललितकला अकादमीच्या 65व्या प्रदर्शनात त्यांच्या चित्रांचा समावेश झाला. आज ते कला शिक्षकही आहेत. ‘काळ्या निळ्या रेषा‘ या आत्मकथनातून त्यांचा, बँडपासून चित्रकलेपर्यंतचा संपूर्ण प्रवास उलगडतो.
ग्रामीण जीवनातील वास्तव, कला आणि सामाजिक संघर्ष यांचा संगम, हे या पुस्तकातील मुख्य बिंदू आहेत. सातपुडा डोंगररांगा, माती कोरण्यात गेलेले बालपण, पावसाच्या साक्षीने गरिबीसोबतची झुंज, स्त्रीजीवनातील वेदना, जातीय अन्याय आणि निरक्षरता-बेकारी यांचे चित्रण बाविस्करांनी इतके जिवंत केले आहे की, वाचकाला गावकुसाबाहेरचे जग प्रत्यक्ष दिसते.
‘गरिबी ही कपड्यावरची धूळ झटकावी इतकी सोपी नाही; ती कायम स्वतःला दिसणारी, अंगावर खोलवर भेदत गेलेली एक जखम आहे,‘ या वर्णनातून वेदनेचा डंख जाणवतो. दलित साहित्याच्या परंपरेत तोलले जाणारे हे आत्मकथन अनेकार्थाने वेगळे ठरते. त्यात घृणा नाही, तर सकारात्मक मांडणी असणारा संघर्ष, इमानदारी आणि मानवतावाद आहे. अण्णा भाऊ साठे यांच्या वारशाचे हे पुढचे पाऊल वाटते.
‘काळ्या निळ्या रेषा’ हे आत्मकथन चित्रकाराच्या हातूनच उमटलेल्या घाटदार रेषांसारखे आहे. भाषा सुबोध, अनलंकृत आणि संवेदनशील आहे. अहिराणी बोलीचे संवाद, निसर्गवर्णन आणि चित्रमय वर्णने यामुळे प्रत्येक प्रकरण डोळ्यासमोर दृश्य उभे करते. बाविस्करांनी स्वतःच रेखाटलेल्या चित्रांसह प्रकरणे सजवली आहेत. नाट्यमयता, गतिमान मांडणी आणि संयत विद्रोह यामुळे पृष्ठसंख्या (412) मोठी असूनही एकही पान रटाळ वाटत नाही. वाङ्मयीन मूल्ये कसदार आहेत. हे पुस्तक 2023-24 पासून एम.ए. मराठीच्या ‘मराठी आत्मकथन’ अभ्यासक्रमात समाविष्ट झाले आहे.
‘काळ्या निळ्या रेषा’ हे आत्मकथन वाचकाच्या मनात दीर्घकाळ ठसा उमटवण्यात यशस्वी ठरते. गरिबीच्या अंधारात वाढूनही, कलेने आणि कष्टाने भोवताली उजेड निर्माण करणाऱ्या त्यांच्या प्रवासातून प्रेरणा, संवेदना आणि माणूसपण समृद्ध होते. राजू बाविस्कर यांनी वास्तवाच्या गर्भात दडलेले सत्य शब्दरेषांमधून चितारले आहे. मराठी साहित्यप्रेमींसाठी हे पुस्तक केवळ वाचनीय नाही, तर अनुभवण्यासारखे आहे. साहित्य अकादमीने या पुस्तकाचा गौरव केला असे आपण नक्कीच म्हणू शकतो परंतु या पुस्तकाच्या निवडीने साहित्य अकादमीवरचा विश्वास दृढ होण्यास हातभार लागला असे म्हणणे अधिक उचित ठरेल..
राजू बाविस्करांशी माझी व्यक्तिशः ओळख झाली त्याची पार्श्वभूमी, सोलापुरच्या लोकमंगल साहित्य पुरस्कारांची होती! अतिशय विनम्र, साधे निगर्वी आणि डाउन टू अर्थ असे त्यांचे व्यक्तिमत्व! साहित्य अकादमी पुरस्कारासाठी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
- समीर गायकवाड
