
राणीसावरगाव (प्रतिनिधी )| दि. १० मार्च २०२६ रोज सोमवारी सकाळी ठीक 9 वा. छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयात मोठया उत्साहात जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला,कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षक मॅडमना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला. तसेच शाळेच्या वतीने सर्व महिला शिक्षकांना पर्स भेट देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य जोसेफ शेवियार सर उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून पालक प्रतिनिधी सौ. अर्चनाताई स्वप्नील रेवनवार या होत्या.
या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थिनींनी भारतातील विविध कर्तृत्ववान महिलांच्या वेशभूषेत सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. यामध्ये भक्ती शिवसांब कोरे -डॉक्टरच्या वेशात, स्वरा ओंकार कोरे- वकीलच्या वेशात, प्राप्ती गाडवे- कलेक्टरच्या वेशात, शुभांगी घडे-सावित्रीबाई फुले यांच्या वेशात, राजनंदिनी चव्हाण- राणी लक्ष्मीबाई यांच्या वेशात, तर काव्या आंधळे हिने राष्ट्रमाता जिजामाता यांच्या वेशात सर्वांचे लक्ष वेधून घेतले. संघवी निलेवाड ही भारतीय महिला आर्मीच्या वेशभूषेत, श्रुतीका स्वप्नील रेवणवार- इंजिनिअरच्या वेशात, अन्वी गजानन कटकमवार-धावपटू पी.टी. उषा यांच्या वेशात तर श्रेया वाघमारे ही आर्मीच्या वेशभूषेत कार्यक्रमात सहभागी झाली होती.

कार्यक्रमात अनेक विद्यार्थ्यांनी स्त्रीशक्तीचे महत्त्व सांगणारी मनोगते व्यक्त केली. या वेळी शाळेच्या शिक्षिका सौ.माया कोल्हे मॅडम यांनी आपल्या मनोगतात स्त्री ही कुटुंबाची तसेच समाजाची आधारस्तंभ असून शिक्षणामुळे स्त्री सक्षम होते आणि समाजाच्या प्रगतीला गती मिळते, असे सांगितले. मुलींनी आत्मविश्वासाने पुढे जात शिक्षणाच्या जोरावर मोठी स्वप्ने पूर्ण करावीत, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला.
यानंतर शाळेच्या क्लार्क पवार मॅडम यांनी स्त्रीच्या कष्टमय आणि प्रेरणादायी जीवनावर प्रकाश टाकत महिलांच्या शिक्षणाचे व स्वावलंबनाचे महत्त्व अधोरेखित केले. शाळेच्या सेविका सखुताई यांनीही स्त्रियांच्या त्याग आणि कष्टांविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या.
तसेच शाळेचे शिक्षक श्री वैजेनाथ आडे सर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, आई हीच मुलांची पहिली गुरू असते. तिच्या संस्कारातूनच समाज घडतो. त्यामुळे प्रत्येकाने स्त्रीचा सन्मान केला पाहिजे आणि तिच्या कर्तृत्वाचा आदर केला पाहिजे.
श्री सागर मोटगी सर यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले की, आजच्या काळात महिलांनी शिक्षण, विज्ञान, क्रीडा, प्रशासन आणि सैन्य अशा प्रत्येक क्षेत्रात आपले सामर्थ्य सिद्ध केले आहे. मुलींनी स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून ध्येय गाठण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत.
या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून शाळेच्या पालक प्रतिनिधी सौ. अर्चनाताई स्वप्नील रेवणवार यांनी आपल्या मनोगतात शाळेबद्दल समाधान व्यक्त करत सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज शाळा ही खरोखर गुणवंत विद्यार्थी घडवणारी संस्था आहे. यावर्षी चार विद्यार्थ्यांची JEE मध्ये निवड झाल्याचे ऐकून खूप आनंद झाला. या शाळेतील शिक्षक अतिशय मेहनती असून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत.या शाळेत शालेय अभ्यासाबरोबर JEE-NEET व MHT-CET चे नियमित फॉउंडेशन क्लास व परीक्षा होतात. आणि शाळा घेत असलेल्या विविध उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण विकसित होत आहेत. माझ्या मुलीम या शाळेत शिकत असल्याचा मला अभिमान वाटतो.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात प्राचार्य जोसेफ शेवियार सर यांनी सांगितले की, शाळेचे सचिव श्री शिवसांब कोरे सर यांचे स्वप्न आहे की राणीसावरगाव आणि परिसरातील विद्यार्थ्यांना गावातच दर्जेदार शिक्षण मिळावे. गरीब पालकांवर जास्तीचा आर्थिक भार पडू नये म्हणून कमी शुल्कात गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा प्रयत्न सुरू आहे. केरळ व स्थानिक भागातील गुणवंत शिक्षकांच्या मेहनतीमुळे या शाळेतील अनेक विद्यार्थी डॉक्टर, इंजिनिअर होत आहेत आणि स्पर्धा परीक्षांमध्येही यश मिळवत आहेत. पहिलीतील अनेक विद्यार्थी मराठीसह इंग्रजी वाचन सहज करतात, यावरून शिक्षकांची मेहनत दिसून येते असे सांगितले. या कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी क्रीडा शिक्षक परमेश्वर क्षीरसागर सर , भांगेसर, वर्षा मेकाले मॅडम,म्हेत्रे मॅडम, खटिंग मॅडम, वेदांती थंडवे मॅडम,कल्पना चाटे, निलेवाड मॅडम, सोनसळे मॅडम, हालकुडे मॅडम, सौ. नाईक मॅडम, सायन्स टीचर फिजा मॅडम, तांबरे मॅडम, सौ. गंगथडे मॅडम, पवार मॅडम,व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.
या कार्यक्रमाचे अतिशय सुंदर सूत्रसंचालन या शाळेच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ. संपदा कटकमवार मॅडम यांनी केले तर आभार वर्षा मेकाले मॅडम यांनी केले कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
