
लेखक:- डॉ.गोरखनाथ सुकदेव देवरे
रिटायर्ड मेडिकल ॴॅफिसर ,स्वामी विवेकानंद नगर,येवला रोड, नांदगाव जि.नाशिक

॥आत्मा मालिक।गुरु ओम्।गुरु ओम्॥ हरिपाठ चिंतन अभंग क्र-१३ समाधि हरीची सम सुखेंवीण ।न साधेल जाण द्वैतबुध्दी ॥१॥ बुध्दीचें वैभव अन्य नाहीं दुजें । एका केशवराजें सकळ सिद्धि ॥२॥ ऋध्दी सिध्दी निधी अवघीच उपाधि । जंव त्या परमानंदीं मन नाहीं ॥३॥ ज्ञानदेवी रम्य रमलें समाधान । हरीचें चिंतन सर्वकाळ ॥४॥
हरीची समाधी-चित्ताची सहज विर्विकल्प स्थिती। समा-समान, एकसारखी, धी-बुध्दी, समान बुध्दी, स्थितप्रज्ञ वृत्ती। चित्त ईश्वररुपासी पूर्ण समरस, एकरुप होणे। सविकल्प, निर्विकल्प असे समाधी चे प्रकार आहेत। ईश्वराशी एकरुप होणे म्हणजे समाधी। स्वत:चाही विसर पडणे, ईश्वरात तल्लीन होणे। समाधीत समसुख असते, समसुख म्हणजेच समदर्शन। या अवस्थेत दु:ख नसतेच। “यस्मिन् सर्वाणि भूतानि आत्मैवाभूद्विजानत:। को मोह: तत्र क: शोक: एकत्वमनुपश्यत:॥ईशावास्य उप-७॥ त्या अद्वैत अवस्थेत कसलाही मोह, शोक, भय नाही। ईश्वर सर्वत्र समान रुपाने व्याप्त असल्यामुळे त्याचे समदर्शन हे सुखदायक आहे। द्वैतबुध्दीने हे साध्य होत नाही। ही समसुखात्मक समाधी हेच बुध्दीचे खरे वैभव आहे। निश्चयात्मिका बुध्दि:। अंत:करणाची निश्चय करण्याची जी शक्ती तिला बुध्दी असे नाव आहे। मन, चित्त, बुध्दी, अहंकार अंत:करण चतुष्टय इत्यादि विषय अध्यात्मात आहेत। बाह्य विषयांचा त्याग करुन जेव्हा मन, बुध्दी अंतर्मुख होते, तेव्हा आत्मसुखाचा अनुभव येतो। क-ब्रम्हदेव, व-विष्णु, श-शिव या तिन्ही शक्तींनी युक्त तो केशव अर्थात ब्रम्ह। एका ईश्वरचिंतनाने खरी आत्मसिध्दी प्राप्त होते।
जर ईश्वराचे ठिकाणी मन नसेल तर ऋध्दी-सिध्दी या फक्त उपाधीच आहेत, सिध्दींनी साधक मोहात पडतो, व भ्रमामुळे ईश्वरप्राप्ती न होता अध:पतन होते। अध्यात्मिक साधना करतांना साधकाला केव्हातरी सिध्दी प्राप्त होतात,,, मयि धारयत: चेत: उपतिष्ठन्ति सिध्दय:॥ असा भागवतात श्लोक आहे। सिध्दींचे अनेक प्रकार आहेत। त्यामध्ये आसक्त न होता साधकाने पुढे गेले पाहिजे। त्यासाठीच वैराग्य आवश्यक आहे।
ब्रम्हानंदापुढे सिध्दींचे सुख, महत्व काहीच नाही। त्यामुळे धैर्याने साधना करीत राहिले पाहिजे।
ज्ञानदेवी रम्य रमलें समाधान । हरीचें चिंतन सर्वकाळ ॥४॥ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अतिशय रम्य रमणीय सुखप्रद असे समाधान माझ्या ठिकाणी रमले। स्थिर झाले आहे। त्या ईश्वराव्च्या समाधीतच माझे सर्वकाळ चिंतन सहजपणे होत आहे। समाधी हा विषय फक्त वाचण्याचा किंवा ऐकण्याचा विषय नाही, हा विषय ध्यानाच्या सतत नियमीत अभ्यासातून प्रत्यक्ष अनुभवण्याचा विषय आहे। [06-01-2023]
