
नाशिक:(प्रतिनिधी)-स्पर्धेच्या युगात आज समाजातील परिस्थिती बदलत आहे. सर्वत्र दूषित होणाऱ्या वातावरणात संस्काराची शिदोरी जपण्याची जबाबदारी सर्वार्थाने आपली आहे, असे प्रतिपादन क.का.वाघ शिक्षण संस्थेच्या विश्वस्त आणि ज्येष्ठ साहित्यिका शकुंतला वाघ यांनी केले.
गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या वतीने हुतात्मा स्मारकात आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ उपक्रमात २३६वे पुष्प गुंफताना ‘माझ्या हिरदिची उकळी’ या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करत होत्या. अध्यक्षस्थानी माजी आ.नानासाहेब बोरस्ते होते.
शकुंतला वाघ पुढे म्हणाल्या की, पूर्वीची सासुरवाशीण सुखदु:खाच्या भावना ओव्यांमधून व्यक्त करत होती. आज कौटुंबिक परिस्थिती बदलत आहे. चौकोनी कुटुंब पद्धती आल्यामुळे एकत्रित कुटुंबव्यवस्था ढासळत आहे. पूर्वीची परिस्थिती आणि जिव्हाळा आटत चालला आहे. आजीआजोबा जवळ नाही म्हणून बालपण हरवत चालले आहे. ही आजची ढासळलेली परिस्थिती विचार करायला भाग पाडते. कुंकवाची जागा आता टिकलीने घेतली आहे. सुसंस्कार शिकवणारी भारतीय संस्कृती जतन करण्याची आज गरज आहे, असे सांगून विविध ओव्या सादर करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
वसुंधरा वेलजाळी आणि प्रतिभा बागुल यांना ग्रंथभेट देऊन सन्मानित करण्यात आले.
डॉ.शोभा सातभाई यांनी आभार मानले. सुरेश पवार यांनी सूत्रसंचालन केले. दरम्यान येत्या मंगळवारी (१०) कविता बिरारी ‘काव्यवेल’ या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करणार आहेत.
