
लेखक:- डॉ.गोरखनाथ सुकदेव देवरे
रिटायर्ड मेडिकल ॴॅफिसर ,स्वामी विवेकानंद नगर,येवला रोड, नांदगाव जि.नाशिक

॥आत्मा मालिक॥ गुरु ओम् गुरु ओम्॥ हरिपाठ अभंग क्र-८ “संतांचे संगती मनोमार्गे गती। आकळावा श्रीपती येणे पंथे॥१॥ रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा। आत्मा जो शिवाचा रामजप॥२॥ एकतत्व नाम साधिती साधन। द्वैताचे बंधन न बाधिजे॥३॥ नामामृत गोडी वैष्णवा लाधली। योगिया साधली जीवनकळा॥४॥ सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला। उध्दवा लाधला कृष्णदाता॥५॥ ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ। सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे॥६॥
संतांच्या संगतीमध्ये मनोमार्गाची गती करणे, मनाला संतसंगतीची आवड लावणे व संतसंगती करणे हा श्रीपती म्हणजे ईश्वराला आकळण्याचा, म्हणजे तो पूर्णपणे स्वाधीन ठेवण्याचा मार्ग आहे। ईश्वर प्राप्तीचा सोपा मार्ग संतांची संगती, सत्संग करणे। सत् म्हणजे ईश्वर, त्या सत् ची संगती, सान्निध्य, सहवास म्हणजे सत्संग। सत् सत्य सतत उपलब्ध असणारा। प्रत्येक मनुष्याच्या मनाची गती, प्रवृत्ती, ओढ, कल प्रपंचाकडे असतो। पंच विषयसुखांकडे असतो। मनाची ही गती बदलून ती ईश्वराकडे, संतांचे संगतीकडे लावली पाहिजे। मनाशिवाय कोणताच व्यवहार होऊ शकत नाही। “अध्यात्म शास्री इये। अंतरंगचि अधिकारिये॥ज्ञानेश्वरी॥” आध्यात्मात तर मन, अंतरंग हेच महत्वाचे आहे। मन हा एक खूप महत्वाचा विषय आहे। मन म्हणजे काय? त्याचे स्वरुप काय? मन चंचल का आहे? मनाला स्थिर करण्याचे, मनाला जिंकण्याचे उपाय काय? यबद्दल चे सविस्तर विवेचन ग्रुपवर योग्य वेळी ठेवण्यात येईल। भागवतात श्रीकृष्णांनी उध्दवाला संतांची व खर्या भक्ताची काही लक्षणे सांगीतली,
“निरपेक्षं मुनिं शातं निर्वैरं समदर्शनं। अनुव्रजाम्यहं नित्यं पूयेयेत्यंघ्रिरेणुभि: ॥भा-१४-१६॥ “ संत कसा असतो? निरपेक्ष- कसलीही अपेक्षा नसलेला, मुनि- मननात, चिंतनात मग्न, शान्त-निर्विकार स्थिती, निर्वैर- कोणाही प्राणीमात्रा बद्दल द्वेष नाही, “कोण्याही जीवाचा न घडो मत्सर। वर्म सर्वेश्वर पुजनाचे।“ समदर्शी, असा जो निरपेक्ष संत, भक्त असतो, त्याच्या मागे मागे मी {श्रीकृष्ण} चालतो, त्याच्या पायाच्या धूलिकणाची प्राप्ती करण्यासाठी, अशा संतांच्या पाय धूळीने चरण धूलीच्या एका कणाने माझे १४ भुवने पावन व्हावेत या साठी।
सिध्द ग्रंथांचा अभ्यास, सहवास याला सुध्दा सत्संग म्हणता येईल। संतांच्या संगतीत, राहणे, संतांच्या विचारात रममाण राहणे तसेच सद्गुरुंच्या सत्संग केंद्रात स्वाध्याय, साधना करणे हे सर्व सत्संगच आहेत। संतांच्या संगतीमुळे, विचारांमुळे मन शुध्द होते, ईश्वराकडे वळते, इश्वर भक्ती चे महत्व कळले की मनुष्य आवडीने साधना करु लागतो, व संतानी, सद्गुरुंनी उपदेश केल्याप्रमाणे साधना केल्यास योग्य वेळी खात्रीने ब्रम्हप्राप्ती होते। ग्रंथ वाचनात स्वत:ला श्रम करावे लागतात, तरीही ते समजतीलच असे नाही। त्यापेक्षा ज्यांचा ग्रंथांचा ही अभ्यास आहे व ईश्वरानुभूति आहे अशा संतांकडून ब्रम्हज्ञान समजून घेणे सोपे व खात्रीशीर असते। त्यामुळेच संत संगती ला विशेष महत्व आहे। ब्रम्हज्ञाना बद्दल असे म्हटले आहे की, “ब्रम्हज्ञान ऐकायला मिळने दुर्लभ आहे, ते समजून सांगणारा वक्ता म्हणजे ज्ञाता मिळणे ही दुर्लभ आहे। कारण ब्रम्हज्ञान हे कोणी सांगितल्याशिवाय स्वत: च्या बुध्दीने सहजसहजी कळत नाही।”
“श्रवणायापि बहुभिर्यो न लभ्यः, शृण्वन्तोऽपि बहवो यं न विद्युः। आश्चर्यो वक्ता कुशलोऽस्य लब्धाऽऽश्चर्यो ज्ञाता कुशलानुशिष्टः॥कठो-१-२-७॥ न नरेणावरेण प्रोक्त एष, सुविज्ञेयो बहुधा चिन्त्यमानः। अनन्यप्रोक्ते गतिरत्र नास्ति, अणीयान् ह्यतर्क्यमणुप्रमाणात्॥कठो-१-२-८॥“ ब्रम्ह्ज्ञान ऐकायला ही सर्वांना मिळत नाही, ऐकले तरी समजेलच असे नाही। अत्यंत सूक्ष्म असल्याने कोणी दुसर्याने, त्यातील जाणत्याने समजून सांगीतल्याशिवाय समजत नाही। असे कठोपनिषदात सांगीतले आहे।
रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा। आत्मा जो शिवाचा रामजप॥२॥ “रामकृष्ण” असा जप सतत करणे हा जीवांचा अत्यंत शुभ असा भाव आहे। रामजप हा शिवाचा आत्मा आहे, म्हणजे अत्यंत जवळचा, आवडीचा, प्रेमाचा विषय आहे। हरिहर असा भेद करु नये, दोन्ही एकच आहेत, भगवान शिव रामानामाचा नित्य जप करतात, तर श्रीराम शिवाचा जप करतात। भगवान शंकरांनी समुद्र मंथनातून १४ रत्ने निघाली तेव्हा हलाहल विष प्राशन केले, त्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला, [नीलकंठ] तेव्हा मस्तकावर शीतल चंद्र धारण केला, सर्प गळ्यात घातले पण दाह थांबेना। तेव्हा शिवांनी रामनामाचा जप सुरु केला, आणि रामजपाने त्यांचा दाह शांत झाला। रामकृष्ण नामाचे असे महत्व आहे।
एकतत्व नाम साधिती साधन। द्वैताचे बंधन न बाधिजे॥३॥नाम हेच एक श्रेष्ठ तत्व आहे। अखंड नामस्मरण करीत राहिल्यास द्वैताचे बंधनाची बाधा होत नाही। “द्विधेतं द्वीतमित्याहुस्तद्भावो द्वैतमुच्यते।”-बृहदारण्यक ४-३-१८६॥ द्विधा म्हणजे दोन प्रकार। सुख-दु:ख, शुभाशुभ, शीत-ऊष्ण, जीव-शिव, असे अनेक प्रकारचे भेद आहेत, त्यांना द्वैत असे नाव आहे। जोपर्यंत भेद दृष्टी आहे, तोपर्यंत बंधन आहे, “द्वितीयाद् वै भयं भवति” जो पर्यंत द्वैत आहे, तोपर्यंत भय आहे, द्वैत गेले की भेद गेला, जीव-ईश्वर, जीव-शिव हे भेद जातात व सर्वत्र अद्वैताचा अनुभव येतो। “देश काल वस्तु भेद मावळला। आत्मा निर्वाळला विश्वाकार॥” हा संत तुकाराम महाराजांचा स्वानुभव। “एकमेवाद्वितीयं ब्रम्ह” “सर्वं खल्विदं ब्रम्ह। नेह नानास्ति किंचन॥” असा अद्वैताचा अद्वितीय अनुभव येतो। जीव ब्रम्हच होतो। “जीवो ब्रम्हैव नापर:।” असा अनुभव येतो। “तत्र को मोह: क: शोक: एकत्वमनुपश्यत:।” एकत्वाच्या अनुभवाच्या ठिकाणी कसला मोह? कसले दु:ख? कसला शोक? सर्व आनदच आनंद आहे।
रक्त श्वेत कृष्ण पीत प्रभा भिन्न। चिन्मय अंजन सुदले डोळा॥१॥ तेणे अंजन गुणे दिव्य दृष्टी आली। कल्पना निमाली द्वैताद्वैत ॥२॥ देश काल वस्तु भेद मावळला। आत्मा निर्वाळला विश्वाकार॥३॥ न झाला प्रपंच आहे परब्रम्ह। अहं सोऽहं ब्रम्ह आकळले॥४॥ तत्वमसि विद्या ब्रम्हानंद सांग। तेचि झाला अंगे तुका आता॥५॥- तुकाराम महाराजांना गुरुकृपेने अद्वैताचा अनुभव आला तो त्यांनी या अभंगात वर्णन केला आहे। सिध्दयोगात बाबा मुक्तानंदांनी या अभंगाचे उदाहरण दिले आहे। साधकाला साधनेत येणारा अनुभव यात आहे। गुरूंच्या कृपेने ध्यानात अगोदर लाल, श्वेत, काळी नीळी अशा ४ ज्योतींचे दर्शन झाले। त्याने डोळ्यात चिन्मय अंजन मिळाले त्या प्रभावाने देश, काळ वस्तु हा सर्व भेद नाहीसा झाला। प्रपंच वेगळा नाहीच तो ईश्वरमयच आहे। अहं ब्रम्ह अस्मि, सोऽहम् याचा अनुभव आला। तत्वमसि वगैरे सर्व अनुभूति आली। मी स्वत:च ब्रम्ह झालो।
नामामृत गोडी वैष्णवा लाधली। योगिया साधली जीवनकळा॥४॥ जशी योग्यांना १७ वी कळा, जीवनकळा साध्य होते, त्याप्रमाणे वैष्णवांना नाम रुपी अमृताची गोडी लाभते। योग साधनेने एका विशीष्ट स्थितीत टाळूतून अमृताचा स्राव होऊ लागतो, त्याच प्रमाणे भक्तांना नामस्मरणात तल्लीन झाल्यावर हा अनुभव येतो। प्रल्हादाला बालपणीच हृदयात ईश्वरनाम बिंबले। अनन्य भक्तीमुळे भगवंताने त्याचे सतत रक्षण केले।
सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला। उध्दवा लाधला कृष्णदाता॥५॥ उध्दव हा श्रीकॄष्ण भगवंताचा एक श्रेष्ठ भक्त होता, भागवताच्या ११ व्या स्कंधात उध्दवाला उपदेश केला आहे। भगवान श्रीकॄष्ण म्हणाले, मी अवतारकार्य संपवून निजधामास जाईन तेव्हा माझा भक्त उध्दव माझ्या ज्ञानाचे रक्षण करील व तोच या ज्ञानाचा सर्वांना उपदेश करील।
ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ। सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे॥६॥
नाम हे अगदी सुलभ आहे, नाम जपाला काही कष्ट लागत नाही। पण नामजपाचे महत्व फार थोड्यांनाच कळते। कारण, देवाचे नाम मुखात येण्यासाठी सुध्दा पूर्वपुण्य लागते। ज्ञानेश्वर महाराज सांगतात,”जन्म जन्मांतरी असेल पुण्य सामग्री। तरीच नाम जिव्हाग्री येईल श्रीरामाचे॥१॥ बहुत सुकृताची जोडी। म्हणुनी विठ्ठली आवडी॥१॥ [01-01-2023]
