
लेखक:- डॉ.गोरखनाथ सुकदेव देवरे
रिटायर्ड मेडिकल ॴॅफिसर ,स्वामी विवेकानंद नगर,येवला रोड, नांदगाव जि.नाशिक

॥आत्मा मालिक॥गुरु ओम्। गुरु ओम्॥ हरिपाठ चिंतन अभंग-७- “पर्वताप्रमाणे पातक करणे। वज्रलेप होणे अभक्तांसी॥१॥ नाही ज्यासी भक्ति ते पतित अभक्त। हरीसी न भजत दैवहत॥२॥ अनंत वाचाळ बरळती बरळ। त्यां कैंचा दयाळ पावे हरी॥३॥ ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान। सर्वांघटी पूर्ण एक नांदे॥४॥
जो देवाची भक्ती करीत नाही, तो नास्तिक असल्यामुळे मनाला वाटेल तसे कर्मे करतो, पापे करतो। त्यामुळे त्याची पापे वज्रलेपा सारखे होतात, म्हणजे ते कधीच नष्ट होत नाहीत। अध्यात्मिक वृत्तीचा मनुष्य पाप कर्मांना भीतो, त्यामुळे शक्यतो वाईट कर्मे करीत नाही। नास्तिक अभक्त मनुष्य शास्राप्रमाणे कर्मे न करता शास्रविरुध्द कर्मे स्वैरपणे करतो, त्यामुळे त्याची पापे वाढत जातात। अभक्ताला जो पापे करतो त्याला शासन सुध्दा आहे। ईश्वर कडक न्यायकर्ता आहे। तो पापी लोकांना पापाचे फळ भोगण्यासाठी शासन करतो, रडवतो म्हणून त्याला “रुद्र” (रडवणारा) असे म्हटले आहे। भगवद्गीतेच्या १६ व्या अध्यायात दैवी व आसुरी संपत्ती च्या लोकांचे वर्णन आहे। आसुरी संपत्ति म्हणजे अभक्त असून पापे करणारा। “अनेकचित्तविभ्रान्ता मोहजालसमावृताः। प्रसक्ताः कामभोगेषु पतन्ति नरकेऽशुचौ।।१६-१६।। तानहं द्विषतः क्रुरान् संसारेषु नराधमान्। क्षिपाम्यजस्रमशुभानासुरीष्वेव योनिषु।।१६-१९।। “भगवान श्रीकृष्ण सांगतात, “पापी लोकांना अनेक अशुभ योनीत मी जन्माला घालतो, जेथे गवत ही उगवत नाही अशा ठिकाणी सर्प चिंचु सारखे जन्मात ते स्वत:च स्वत: ला खातात। असे जन्म मी त्यांना देतो। ते पुन: पुन: अधोगतीला जातात व माझी प्राप्ती त्यांना होत नाही। “
जे भक्ती करीत नाहीत, ते पतित अभक्त आहेत, धर्माचा विचार न केल्यामुळे ते पापे करतात, पतित, त्यांचे पतन होते। अशा त्या पतित अभक्ता वर दयाळु परमेश्वर कशी बरे कृपा करील?
दोन वर्ग जर मानले तर (१) अभक्त आहे व पापे करतो। (२)- भक्त आहे, पण त्याच्याकडून नकळत काही पापे घडतात। पूर्वी काही पापे घडली असतील, व आता त्याला पश्चाताप होत असेल तर, तो जर भक्ती करित असेल तर भगवान श्रीकॄष्ण त्याबद्दल म्हणतात,
“अपि चेत्सुदुराचारो भजते मामनन्यभाक्। साधुरेव स मन्तव्यः सम्यग्व्यवस्थितो हि सः।।९-३०।। क्षिप्रं भवति धर्मात्मा शश्वच्छान्तिं निगच्छति। कौन्तेय प्रतिजानीहि न मे भक्तः प्रणश्यति।।९-३१। “॥भगवद्गीता॥
एखाद्याने पूर्वी कितीही पापे केली असली, पण आता त्याला मनापासून कृतकर्मांचा पश्चाताप झाला, व तो हरिभक्ती करीत असेल तर त्याला त्या क्षणापासून साधूच समजावे। तो त्वरीत धर्मात्मा होतो व शाश्वत सुखाला प्राप्त होतो। अर्जुना, माझ्या भक्ताचा कधीही नाश, अध:पतन होत नाही। तुकाराम महाराज सुध्दा एका अभंगात म्हणतात, “मागे झाले पाहू नका। पुढे जामीन आहे तुका॥१।” तुमच्याकडून मागे काही पापे झाली असतील तरी चिंता करु नका, येथून पुढे सत्कर्म करा, ईश्वर भक्ती करा। येथून पुढे मी स्वत: तुम्हाला जामीन आहे, माझ्या शब्दावर विश्वास ठेवा, तुमचे कल्याणच होईल।
अनंत वाचाळ बरळती बरळ। त्यां कैंचा दयाळ पावे हरी॥३॥ काही जण काहीही मनाला येईल तसे बरळतात, काहीही बोलतात, त्यांना देव कसा पावेल? हरीची कृपा त्यावर कशी होईल? याचे एक उदाहरण- चार्वाक नावाचा एक संप्रदाय आहे। नास्तिकमतवादी। सृष्टीच्या आरम्भापासून आस्तिक नास्तिक मते, संप्रदाय आहेत। आताच्या कलियुगात सुध्दा बरेच चार्वाक मतवादी आहेत। चार्वाक मतानुसार, ते म्हणतात,”यावज्जीवेत् सुखं जीवेत्। ऋणं कृत्वा घृतं पिबेत। भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुत:॥१॥ जोपर्यंत जीवात जीव आहे, मनुष्य जीवंत आहे, तोपर्यंत सुखाने जगावे, मौज मजा करावी, त्यासाठी काहीही करावे, कर्ज काढून तूप प्यावे, भौतिक सुखांचा अनुभव घ्यावा, हा जन्म गेल्यावर, हे शरीर जळून भस्म झाल्यावर कसला पुनर्जन्म आणि कसले काय? कोणी पाहिले पुनर्जन्म आहे कि नाही। याला म्हणतात मनाला वाटेल तसे बरळणे। अभक्ताच्या वाचाळपणाचे आणखी एक उदाहरण, गीता अ-१६, श्लोक-८, “असत्यमप्रतिष्ठं ते जगदाहुरनीश्वरम्। अपरस्परसंभूतं किमन्यत्कामहैतुकम्॥१६-८॥ ते म्हणतात, जग असत्य आहे, जगाला ईश्वराने निर्माण केले नाही। जगाचा कर्ता ईश्वर वगैरे काही नाही। त्यामुळे ते स्वैर आचरण करतात। अशा अभक्तावर देव कशी कृपा करील? अभक्तावर ईश्वरकृपा होणार नाही।
ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान। सर्वांघटी पूर्ण एक नांदे॥४॥ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आत्मा हाच प्रमाण आहे, सर्व घटात, सर्वांच्या शरीरात राहातो, सर्वात राहातो। सर्वात राहून सुध्दा सर्वांपासून अलिप्त असतो। “यथा सर्वगतं सौक्ष्म्यादाकाशं नोपलिप्यते। सर्वत्रावस्थितो देहे तथात्मा नोपलिप्यते॥१३-३२॥गीता॥ ज्याप्रमाणे आकाश सूक्ष्म, व सर्वत्र व्याप्त असून कोठेही लिप्त होत नाही, तसेच, आत्मा सुध्दा सर्वव्याप्त असून कोठेही लिप्त होत नाही। आत्मा विभु, नित्य, अचल, सनातन, सर्वव्यापी आहे।
