

लेखक : डॉ. गोरखनाथ सुकदेव देवरे, रिटायर्ड मेडीकल ऑफिसर.स्वामी विवेकानंद नगर , येवला रोड, नांदगाव, जिल्हा नासिक
॥आत्मा मालिक गुरु ॐ गुरु ओम्॥हरिपाठ अभंग चिंतन-३ “
त्रिगुण असार निर्गुण हे सार। सारासार विचार हरिपाठ॥१॥ सगुण निर्गुण गुणांचे अगुण। हरिविणे मन व्यर्थ जाय॥२॥ अव्यक्त निराकार नाही ज्या आकार। जेथुनि चराचर त्यासी भजे॥३॥ ज्ञानदेवो ध्यानी रामकृष्ण मनी। अनंत जन्मोनि पुण्य होय॥४॥“ त्रिगुणात्मक जगत् अशाश्वत व असार आहे। तीन गुणांचे पलिकडे असलेले निर्गुण निराकार परब्रम्ह तेच शाश्वत व सार होय। त्रिगुण म्हणजे काय? ६ शास्रांपैकी सांख्यशास्र १ आहे। सांख्य शास्राचे कर्ते कपिल मुनी। सांख्यशास्र भगवद्गीतेला मान्य आहे। गीतेच्या १० व्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण सांगतात, “सिध्दानां कपिलो मुनि:।”-१०-२६॥ सिध्दांमध्ये कपिल मुनी माझीच विभूति आहे। या सांख्य शास्रात २५ तत्वांचा उल्लेख आहे।[२५ ही संख्या म्हणुन सांख्य नाव] पुरुष-प्रकृति-महत्-अहंकार-पंचतन्मात्रा [शब्द-स्पर्श-रुप-रस-गंध] पंचमहाभूते [पृथ्वी-आप-तेज-वायु-आकाश] ११ ईद्रिये [पंच ज्ञानेंद्रिये, पंच कर्मेंद्रिये, ११ वे मन उभयात्मक इंद्रिय]=२५ तत्व। हरिपाठाच्या एका अभंगात आहे-सात पाच तीन दशकांचा मेळा। एकतत्वी कळा दावी हरि। यात २५ तत्व आहेत हे सांगीतले आहे। पुरुष तत्व म्हणजे निर्गुण निराकार ब्रम्ह। प्रकृति म्हणजे माया। ही इश्वराचीच १ शक्ति आहे। “मायां तु प्रकृतिं [विध्दि] विद्यान्मायिनं तु महेश्वरम्। तस्यावयवभूतैस्तु व्याप्तं सर्वमिदं जगत्॥श्वेताश्वतर उपनिषद्॥४-१०॥“ माया म्हणजेच प्रकृती, ही ईश्वराचीच १ शक्ती आहे। सांख्यांनी प्रकृती ची व्याख्या केली,”सत्व-रज-तम या तीन गुणांची साम्यावस्था म्हणजे प्रकृती।” प्रकृती चे सत्व, रज तम हे ३ गुण आहेत। या ३ गुणांनीच हे संपूर्ण विश्व तयार केले। ३ गुणांपासूनच विश्वाची रचना झाली। गुण याचा १ अर्थ दोरी किंवा बंधन। जसे गुराला दोरीने बांधून ठेवतात, तसे या ३ गुणांनी सर्व जीवांना बांधून टाकले आहे। प्रत्येकात ३ गुण कमीजास्त प्रमाणत असतातच। भगवद्गीतेच्या १४ व्या अध्यायात या ३ गुणांचे सविस्तर वर्णन भगवान श्रीकॄष्णांनी केले आहे। य ३ गुणांपासून हे सर्व जग, जगातील सुख दु:ख आहेत, म्हणून याला ज्ञानेश्वर महाराजांनी या अभंगात असार म्हटले आहे। जगातील सर्व सुखे नाशिवंत आहेत, या अर्थाने। त्रिगुण असार। या ३ गुणांनीच या अविनाशी आत्म्याला बंधनात टाकले। हे ३ गुण देहधारी [देहिनं-शरीराचा सूत्रधार, जीवात्मा] आत्म्याला देहाच्या बंधनात टाकतात। सत्व गुण त्या आत्म्याला सुखाची ओढ लावतो, सत्व गुण ज्ञान आणि सुखाच्या लालसेने सुखाचे आमिष दाखवून जीवात्म्याला बंधनात टकतो, रजोगुण कर्माच्या संगतीने देहाच्या बंधनात, व तमो गुण निद्रा, आळस, अज्ञान यांनी बंधनात टाकतो। जोपर्यंत जीव या ३ गुणांच्या बंधनात आहे, तोपर्यंत तो मुक्त होऊ शकत नाही। भगवद्गीतेत म्हटल्रे आहे,” गुणानेतानतीत्य त्रीन्देही देहसमुद्भवान्। जन्ममृत्युजरादु:खैर्विमुक्तोऽमृतमश्नुते॥१४-२०॥ जेव्हा मनुष्य या ३ गुणांना जिंकतो, तेव्हा तो जन्म-मृत्यु म्हातारपण या सर्व दु:खातून कायमचा मुक्त होतो, व अमृत तत्वाची म्ह ईश्वराची प्राप्ती करतो। ३ गुणांपासून तयार झालेला प्रपंच व त्यातील सुखे नाशिवंत आहेत म्हणून त्रिगुण असार असे म्हटले आहे। त्रिगुणांच्या पलिकडे असलेला परमेश्वर निर्गुण निराकार आहे, तो कोणत्याही गुणांच्या बंधनात नाही, तो च सार, म्हणजे शाश्वत सुख आहे।सार-अविनाशी
सत्वं रजस्तम इति गुणा: प्रकृतिसंभवा:। निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनमव्ययम्॥ गीता॥१४-५॥ तत्र सत्वं निर्मलत्वात् प्रकाशकमनामयम्।
सुखसंगेन बध्नाति, ज्ञानसंगेन चानघ॥१४-६॥ न तदस्ति पृथिव्यां वा दिविदेवेषु वा पुन:। सत्वं प्रकृतिजैर्मुक्तं यदेभि:स्यात्त्रिभिर्गुणै:॥गीता-१८-४०॥ पृथ्विपासून ते स्वर्गलोकांपर्यंत असा कोणीही नाही जो या त्रिगुणांपासुन मुक्त असेल। प्रत्येकावर या मायेच्या ३ गुणांचा पगडा [वर्चस्व, बंधन, पाश] आहे। सजीव निर्जीव प्रत्येकावर ३ गुणांचे कार्य चालते।
“यतो वा इमानि भूतानि जायन्ते, येन जातानि जीवन्ति। यत्प्रयन्त्यभिसंविशन्तीति। तद्विजिज्ञासस्व। तद् ब्रम्हेति॥ “तैत्तिरीय उपनिषद-१॥ ज्याच्या पासून हे संपूर्ण विश्व उत्पन्न होते, ज्याच्या साह्याने हे सर्व जगते, या विश्वाचे कार्य चालते, स्थिती। व शेवटी ज्याच्यात हे विश्व लय पावते अशी शक्ती म्हणजे ईश्वर, देव, ब्रम्ह। जगाची उत्पत्ती, स्थिती व लय करणारी अदृश्य शक्ती म्हणजे देव। ॥ जन्माद्यस्य यत: ॥ब्रम्हसूत्र॥१-१-२॥ईश्वर सगुण ही आहे व निर्गुण ही आहे। सगुण साकार व निर्गुण निराकार आहे। दोन्ही रुपे इश्वराचीच आहेत। ईश्वराशिवाय दुसरीकडे मन लावू नये। तसे करणे व्यर्थ आहे। अव्यक्त निराकार नाही ज्या आकार त्या ईश्वरापासून जगाची उत्पत्ती होते हे “देव” शब्दाच्या विवेचनात आपण सविस्तर पाहिले। त्याच ईश्वराची-हरि-ओम्-चे चिंतन, भजन, ध्यान करावे। ज्ञानेश्वर महराज म्हणतात, मी सतत राम-कृष्ण ईश्वराचे मनाने ध्यान करतो, माझे ध्यानी मनी ईश्वरच असतो। त्यामुळे या जन्मात मला अनंत अगणित पुण्याची जोड [संग्रह] होत आहे। अनंत पुण्यप्राप्ती होत आहे। या अभंगाचे विवेचन, चिंतन येथे संपले। [आता आपल्यापैकी जे जिज्ञासु साधक असतील अशा जिज्ञासू साधकांसाठी एक चिंतनाचा अभ्यास आहे। जितके खोलवर आपण चिंतन करु तितका अधिक सूक्ष्म अनुभव येतो। आपल्याला अध्यात्मात खोलवर जाण्याची आवश्यकता आहे। वरवरचे ज्ञान आपण कोठेही ऐकतो, वाचतो, पण अध्यात्म त्यापेक्षाही खोल, गहन आहे। व्यासांनी ब्रम्हसूत्रात म्हटले आहे,” अथातो ब्रम्हजिज्ञासा॥१॥” ईश्वराला जाणून घेण्याची तीव्र तळमळ ही अध्यात्माची पहिली पायरी आहे। पूर्ण प्राप्ति, पुर्ण समाधान प्राप्त होईपर्यंत जिज्ञासा असली पाहिजे। जितकी तीव्र जिज्ञासा, तळमळ, तितकी जास्त प्राप्ती। १ चिंतन आपण सर्वांनी करायचे आहे- त्रिगुण सत्व-रज तम हे असार आहेत, ते आत्म्याला [जीवात्म्याला] बंधनात टाकतात असा भगवद्गीतेत श्लोक आहे। सत्वं रजस्तम इति गुणा: प्रकृतिसंभवा:। निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनमव्ययम्॥ गीता॥१४-५॥ तो भगवान श्रीकृष्णांनी सांगितला आहे त्यामुळे त्रिवार सत्य आहे। आपला प्रश्न आहे, हे ३ गुण आत्म्याला देहाच्या बंधनात का टाकतात? आता आपण प्रारब्ध भोगाण्याकरता आलो असे जरि म्हटले, पण जेव्हा सृष्टी च नव्हती तेव्हा प्रारब्ध वगैरे काही नव्हते। “आधी होता मुक्त, बळे झाला बध्द। छंद माझे माझे घेउनिया।” असे तुकाराम महाराजांचा अभंग आहे। सृष्टीच्या अगोदर आपण मुक्त च होतो, मग या ३ गुणांनी आपल्याला म्हणजे [आत्म्याला, जीवात्म्याला] सर्व जीवांना, बंधनात का टाकले? याविषयी चे चिंतन सर्वांनी करायचे आहे। ऊत्तर असे असले पाहिजे, ते आपल्याला पटले ही पाहिजे, व त्याला संत शास्र प्रमाण ही पाहिजे।]
