
✍️ शब्दांकन प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे
नाशिक जिल्ह्यातील हिरे घराणे स्वातंत्र्यपुर्व काळापासून महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर कार्यरत आहे. हिरे घराण्याचे आद्यपुरूष कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांचा जन्म १ मार्च, १९०५ रोजी मालेगाव तालुक्यातील निमगांव या गावी झाला. सामान्य शेतकरी कुटूंबातील भाऊसाहेबांनी प्रतिकूल परिस्थितीत देखील शिक्षण पूर्ण केले. त्यांचे प्राथमिक शिक्षण त्यांचे मामाचे गाव असलेल्या ‘दाभाडी’ झाले, तर नाशिकला माध्यमिक तर बडोद्याला महाविद्यालयीन शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी पुण्यात एल.एल.बी. केले. बडोदा संस्थानात नोकरीची संधी त्यांना खुणावत होती. मात्र, भाऊसाहेबांनी मालेगांवला ग्रामीण गोरगरीबांसाठी सेवाभावी दृष्टीकोणातून स्वतंत्र वकीली व्यवसाय सुरु केला, पण थोड्याच कालावधीत महात्मा गांधी, पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या विचारांनी प्रेरित झालेले भाऊसाहेब स्वातंत्र्य चळवळीत ओढले गेले.
१९३७ मध्ये त्यांना लोकप्रतिनिधीत्व करण्याची प्रथमतः संधी मिळाली, खर्या अर्थाने येथूनच हिरे घराण्याचा राजकीय ‘‘श्रीगणेशा’’ झाला. ब्रिटीश राजवटीत भाऊसाहेबांनी सत्याग्रहाचे नेतृत्व केले म्हणून त्यांना १५ महिने शिक्षा झाली. १९४७ मध्ये ते लोकसभेवर खासदार म्हणून, तर १९५२ ला मुंबई विधीमंडळावर निवडून गेले. मोरारजी देसाईंच्या मंत्रीमंडळात त्यांच्याकडे शेती, वन व महसूल खात्याचा कारभार होता. त्याकाळी भाऊसाहेबांनी केलेला ऐतिहासिक ‘‘कुळकायदा’’ कोटयावधी शेतकर्यांसाठी वरदान देणारा ठरला. ‘‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या अमृतकुंभाचे’’ भाऊसाहेब हे खरी धनी होते. आदिवासी, दुर्लक्षित, दुर्गम व ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी सन १९४५ मध्ये आदिवासी सेवा समिती, तर सन १९५२ मध्ये महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेची स्थापना केली, तर ‘‘विना सहकार नही उध्दार’’ हा सहकाराचा मुलमंत्र स्विकारत नाशिक जिल्हा बँक, खरेदी-विक्री संघ, गिरणा सहकारी साखर कारखाना, शेतकरी संघ अशा अनेक राज्य, जिल्हा व तालुकास्तरीय सहकारी संस्था स्थापन केल्या व या माध्यमातून महाराष्ट्रात सहकाराची मुहूर्तमेढ रोवली.
जमीनदारी व सावकारशाहीमुळे नाडलेला शेतकरी आणि उत्पन्नाची खात्रीची साधने नसलेला दरिद्री कष्टकरी समाज यांचे दु:ख भाऊसाहेब हिरे यांनी जवळून बघितले होते. ते स्वत: शेतकरी असल्यामुळे ग्रामीण समाजाची आर्थिक दुर्दशा तसेच त्या मागची कारणे त्यांना अवगत होती. या पिचलेल्या वर्गाची आर्थिक पिळवणूक थांबविल्याशिवाय सामाजिक विकास शक्य नाही याची त्यांना पूर्ण जाणीव होती. म्हणूनच त्यांनी या सर्वाच्या उत्कर्षांसाठी ‘सहकार’ तत्त्वज्ञानाची कास धरली. भाऊसाहेबांनी सहकाराच्या माध्यमातून उभे केलेले काम भांडवलशाही व शोषणशाहीच्या विरोधात होते.
आदर्श समाज निर्माण व्हावा अशी त्यांची प्रामाणिक तळमळ होती. शेतकऱ्यांचे सावकार वा व्यापाऱ्यांवरील विसंबित्व कमी व्हावे म्हणून भाऊसाहेबांनी सर्वप्रथम खरेदी-विक्री संघाची स्थापना केली. नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे काम १९२८ पासून बंद होते. तत्कालीन परिस्थितीत बॉम्बे प्रॉव्हिन्सियल को-बँकेच्या शाखांमार्फत कर्ज वाटप होत असे. परंतु हे कर्ज अत्यल्प व मर्यादित असल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागे. ही कोंडी फोडून शेतकऱ्यांची स्वत:ची बँक असावी, यासाठी त्यांच्या प्रयत्नांमुळे १९५५ मध्ये नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेची मुहूर्तमेढ रोवली गेली. या बँकेमुळे जिल्ह्यात सहकार चळवळीला व्यापक स्वरूप प्राप्त करून देणारा पाया घातला गेला. प्राचार्य पुराणिक, दगा पाटील, दादासाहेब बिडकर यांच्यासारख्या सहकार क्षेत्रातील दिग्गजांची त्यांना साथ लाभल्याने सहकार चळवळीचे जाळे जिल्हाभर निर्माण होऊ शकले.
खासगी उद्योजकांकडून होणारी पिळवणूक थांबविण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वत: उद्योजक बनावे असे त्यांचे स्वप्न होते. ऊस, कापूस, तेलबिया यांसारख्या कृषी उत्पादनावर सहकार प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी त्यांनी सहकारी कारखानदारीस उत्तेजन दिले. वैकुंठभाई मेहता, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ धनंजय गाडगीळ यांच्या मार्गदर्शनाखाली भाऊसाहेबांनी दाभाडी येथे गिरणा सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली. निफाड, राहुरी यांसारख्या साखर कारखान्यांच्या उभारणीतही त्यांचे मार्गदर्शन लाभले. सहकारी साखर कारखाना, सहकारी पतसंस्था, बँका, सहकारी सूत गिरण्या, सहकारी खरेदी-विक्री संघ, कृषी उत्पन्न बाजार यांसारख्या संस्थांच्या उभारणीसाठी भाऊसाहेबांनी उपसलेले कष्ट वाखाणण्यासारखे आहे.
★ कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या पवित्र स्मृतीस कोटी कोटी प्रणाम… 🙏🙏
