
सिन्नर ( वसंत गोसावी , प्रतिनिधी: )पाटोळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा झाला. यावेळी विविध शैक्षणिक उपक्रम साजरे झाले. भारताचे महान शास्त्रज्ञ सी. व्ही. रमन यांनी १९२८ साली ‘रमन प्रभाव’ चा शोध लावल्याच्या स्मरणार्थ हा दिवस देशभर साजरा केला जातो. विज्ञानाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा, संशोधनवृत्ती आणि नवोपक्रमाची आवड निर्माण व्हावी हा या दिनाचा मुख्य उद्देश आहे. या निमित्ताने शाळेत चित्रकला, रांगोळी, निबंध लेखन व विज्ञान प्रतिकृती स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.

विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने सहभाग घेत आपल्या कल्पकतेचे आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचे प्रभावी सादरीकरण केले. या प्रदर्शनात विज्ञान प्रतिकृतींनी लक्ष वेधून घेतले होते. या लक्ष्यवेधी प्रतिकृती मध्ये विद्यार्थ्यांनी ज्वालामुखी, प्रकाश संश्लेषण, हवेचा दाब, ब्रेक सिस्टीम, हायड्रोलिक क्रेन, सूर्यमाला, अपारंपारिक ऊर्जा स्रोत, पाणी शुद्धीकरणाच्या पद्धती, दिवस-रात्र प्रक्रिया, चुंबकीय ऊर्जा आदी विषयांवर आकर्षक प्रतिकृती सादर केल्या. अल्पसाधन सामुग्रीतून तयार केलेल्या या प्रतिकृतींनी उपस्थितांचे विशेष लक्ष वेधले.
इयत्ता तिसरी ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणात आत्मविश्वास आणि विषयाची समज स्पष्टपणे जाणवत होती. यावेळी माजी सरपंच सोपान खताळे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुदाम पानसरे, उपाध्यक्ष रावसाहेब चकोर, सदस्य ज्ञानेश्वर कराड, पांडुरंग सांगळे, पोलीस पाटील शिवाजी सदगीर, निवृत्ती कराड, सजन सांगळे, विलास खताळे, संजय कराड, विनायक सांगळे, चंद्रकांत कराड आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्याध्यापक वसंत गोसावी यांनी प्रास्ताविकात राष्ट्रीय विज्ञान दिनाचा हेतू स्पष्ट करताना सांगितले की, “बालवयातच विज्ञानाविषयी जिज्ञासा आणि प्रयोगशील वृत्ती निर्माण झाली तरच भविष्यात सक्षम वैज्ञानिक आणि जबाबदार नागरिक घडतील.”

माजी सरपंच सोपान खताळे यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करून शाळेच्या या उपक्रमाचे मनःपूर्वक स्वागत केले. पाटोळे शाळेची उपक्रमशील शाळेच्या दिशेने सुरू असलेली वाटचाल गावांसाठी अभिमानास्पद आहे.
सुदाम पानसरे यांनी शाळेच्या या विद्यार्थीकेंद्रीत उपक्रमांचे अभिनंदन केले.
विलास खताळे यांनी शाळेत अद्ययावत प्रयोगशाळा नसली तरी विद्यार्थ्यांनी अल्पसाधनांतून राबविलेला हा उपक्रम जिल्हा परिषद शाळा कुठेही कमी नसल्याचे सिद्ध करणारा असल्याचे मत व्यक्त केले.
कार्यक्रमास पालकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. पालकांच्या उपस्थितीमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास द्विगुणित झाला आणि स्पर्धेला अधिक रंगत आली. मुख्याध्यापक वसंत गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली वर्गशिक्षक सुनिता बर्वे, कैलास पवार, मिना सोनवणे, प्रतिभा पवार, स्वाती खताळे, सुनिता खताळे आदी शिक्षकांनी मोलाचे संयोजन केले. कैलास पवार यांनी सुत्रसंचलन केले. राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या माध्यमातून शाळेने विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याचा स्तुत्य प्रयत्न केला असून हा उपक्रम ग्रामस्थ व पालकांच्या सहकार्यामुळे अधिक यशस्वी ठरला.
