
नाशिक (वार्ताहर) – कुसुमाग्रजांनी ‘कणा’ कवितेतून संकटात सापडलेल्या तरुणाईला आत्मसन्मानाने, जिद्दीने उभे राहण्याची, लढण्याची प्रेरणा दिली. प्रतिकुल परिस्थितीत जीवनातील नैराश्य झुगारून पुढे जाण्याचा क्रांतिकारी विचार मांडला. केवळ जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबरोबर स्वाभिमान, आत्मविश्वास, जिद्द, चिकाटीने लढण्याचा संस्कार होतो. असे प्रतिपादन प्रा. अमोल अहिरे यांनी केले, ते बोरटेंभे येथील जि. प. सेमी इंग्रजी उच्च प्राथमिक आदर्श शाळेत आयोजित मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका सरला देवरे होत्या.

समवेत जनार्दन कडवे, प्रशांत बांबळे, माणिक भालेराव, अनिता बुवा, वेणुबाई मेंगाळ, दशरथ सोनवणे आदी उपस्थित होते. एकाग्रता ही ज्ञानसाधनेची गुरुकिल्ली आहे. कॉन्सन्ट्रेशन (एकाग्रता), कॉन्फिडन्स (आत्मविश्वास) व कॉम्पिटिशन (स्पर्धा) या ‘ट्रिपल सी’चे सूत्र विद्यार्थ्यांनी अंगिकारावे असे आवाहन प्रा. अहिरे यांनी केले. प्रसंगी गावातून ग्रंथदिंडी काढण्यात आली. तसेच रांगोळी, निबंध, वत्कृत्व कविता वाचन, वेशभूषा आदी स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. विद्यार्थ्यांनी गायन, समूह नृत्यांचे सादरीकरण केले. परिचय व सूत्रसंचालन अतुल अहिरे यांनी केले तर आभार राजेश बावनगडे यांनी मानलेत.

