
नांदगाव( प्रतिनिधी): येथील मविप्र समाज संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी डॉ. सी व्ही रमण यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण मुख्याध्यापिका ज्योती काळे, उपमुख्याध्यापक दीपक चव्हाण, पर्यवेक्षक अविनाश शेवाळे व उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले.
विज्ञानाप्रती विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण व्हावी आणि त्यांच्यातील वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा, या उद्देशाने विद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांचे मनोगत व नाविन्यपूर्ण प्रयोग
याप्रसंगी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विज्ञान दिनाचे महत्त्व विशद केले. श्रीकृष्ण कुमावत या विद्यार्थ्यांने आधुनिक आवर्त सारणी ११८ मूलद्रव्य सांगितले.काजल शिंदे आणि रचना जाधव या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना थोर भारतीय शास्त्रज्ञ सी. व्ही. रामन यांच्या कार्याचा गौरव केला.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण महेश सोमासे या विद्यार्थ्याने सादर केलेला प्रयोग ठरला. त्याने ‘वायू प्रदूषणापासून विद्युत निर्मिती’ या विषयावर आधारित एक नाविन्यपूर्ण प्रयोग सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. वाढत्या प्रदूषणावर उपाय म्हणून विजेची निर्मिती कशी करता येईल, हे त्याने प्रात्यक्षिकाद्वारे दाखवून दिले.
विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षकांनी मौलिक मार्गदर्शन केले.
उपशिक्षिका शितल तासकर यांनी आपल्या मनोगतात रमण परिणाम ( effect ) सांगितला.
उपशिक्षक प्रणोद गोटे यांनी विज्ञानातील नवनवीन संधी आणि दैनंदिन जीवनातील विज्ञानाचे महत्त्व यावर प्रकाश टाकला.
उपमुख्याध्यापक दीपक चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना वैज्ञानिक वृत्ती जोपासण्याचे आवाहन करत, भविष्यातील शास्त्रज्ञ घडवण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जया गवळी यांनी केले. या कार्यक्रमाला विद्यालयातील विज्ञान शिक्षक अण्णा दुकळे, अजित पगार, गजेंद्र माताडे, भाऊसाहेब सोनवणे, प्रणोद गोटे, नरेंद्र पाटील , सरला बिडवे, सविता बोरसे, प्रयोगशाळा सहाय्यक यशवंत काकळीज,सर्व शिक्षक, शिक्षिका, व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
