

लेखक : डॉ. गोरखनाथ सुकदेव देवरे, रिटायर्ड मेडीकल ऑफिसर.स्वामी विवेकानंद नगर , येवला रोड, नांदगाव, जिल्हा नासिक
॥आत्मा मालिक गुरु ॐ गुरु ओम्॥ हरिपाठ अभंग चिंतन-“देवाचिये द्वारी उभा क्षणभरी। तेणे मुक्ति चारी साधियल्या॥१॥उभा क्षणभरी म्हणजे काय? ऊभा म्हणजे जागृत, क्रियाशील असणे। सकृदुच्चारितं येन हरिरित्यक्षरद्वयं। बध्दपरिकरस्तेन मोक्षाय गमनं प्रति॥१॥ नारद पुराण॥ श्री नारद महर्षि म्हणतात, “हरि” हि २ अक्षरे ज्याने एकदाच उच्चारली आहेत, त्याने मोक्षास जाण्यासाठी कंबरच बांधली आहे, असे समजावे। तरी एका क्षणाने कशी प्राप्ती होईल? प्रयत्नाद्यतमानस्तु योगी संशुध्दकिल्बिष:। अनेकजन्मसंसिध्दस्ततो याति परां गतिं॥६-४५॥ कारण स्वत: ज्ञानेश्वर महाराजांनी अनेक जन्म घेऊन साधन केली। त्यांचा अनुभव त्यांनी सांगितला- तेणे बहुती जन्मे मागीली। विक्षेपांची पाणिवळे झाडिली। म्हणौनी उपजतखेवो बुडाली। लग्नघटिका॥६-४७१॥ त्याने मागील अनेक जन्मात विक्षेपाचा प्रतिबंध हाच कोणी पाण्यावरील केरकचरा झाडून टाकलेला असतो, म्हणून त्याची लग्नघटका त्याचा जन्म होताच क्षणी बुडाली॥४७१॥ मय्येव मन आधस्त्व मयि बुध्दिं निवेशय। निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशय:॥१२-८॥ अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम्। अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनंजय॥१२-९॥ ॥भगवद्गीता॥
अभ्यासेऽप्यसमर्थोऽसिमत्कर्मपरमो भव। मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिध्दिमवाप्स्यसि॥१२-१०॥ अथैदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रित:। सर्वकर्मफलत्यागं तत: कुरु यतात्मवान्॥१२-११।। अथवा हे चित्त। मनबुध्दिसहित। माझ्या (ठाई) हाती अचुंबित। न शकसी देवों।१०४॥ तरी गा ऐसे करी। यया आठां पाहरांमाझारी। मोटके निमिषभरी। देतु जाय॥१०५॥ मग जे जे का निमिख। देखेल माझे सुख। तेतुले अरोचक। विषयी घेईल॥६॥ जैसा शरत्कालु रिगे। आणि सरिता वोहटू लागे। तैसे चित्त काढेल वेगे। प्रपंचौनि॥७॥ मग पुनवेहूनि जैसे । शशीबिंब दिसेंदिसें। हारपत अंवसे। नाहींचि होय॥८॥ तैसे भोगाआंतूनि निघता। चित्त मजमाजी रिगता। हळू हळू पंडुसुता मीची होईल॥९॥ अगा अभ्यासयोगु म्हणिजे। तो हा एकु जाणिजे। येणें काही न निपजे। ऐसे नाही॥ज्ञा-१२-११०॥ भगवद्गीतेत १२ व्या अध्यायात ईश्वर प्राप्ती चे ४ उपाय संगितले आहेत। भगवान श्रीकॄष्ण अर्जुनाला सांगतात, जर तुला सतत तुझे मन बुध्दी मला अर्पण करणे शक्य नसेल तर अभ्यासयोगाने मला प्राप्त करण्याचा प्रयत्न कर। अभ्यासयोग म्हणजे दिवसातून काही वेळ, काही क्षण माझे चिंतन कर। ज्या क्षणाला माझ्या आत्मसुखाचा तुला अनुभव येईल तितके ते प्रंपंचाच्या आसक्तीपासून दूर होईल। मग जसे चंद्रबिंब पौर्णिमेला पूर्ण असते व कलेकलेने रोज कमी होत अमावस्येला पूर्ण नाहिसे होते, त्याप्रमाणे प्रपंचात आसक्त असणारे तुझे चित्त माझ्या ठिकाणी एकरुप होईल। क्षण याचा अर्थ- पेलाभर पाणी व तांब्याभर पाणी यांची तुलना केली तर त्यांब्यातील पाण्यापुढे पेला काहीच नाही। बादली, माठ, विहीर, नदी, समुद्र यातील पाण्याची परस्परांशी तुलना केल्यास एकाचे पाणी दुसर्या पुढे काहीच नाही। तसेच काल हे द्रव्य अनादि आहे। अक्षरात् संजायते काल:॥ अक्षर ब्रम्हापासून काळाची उत्पत्ती झाली। काळ अनादि अनंत आहे। त्या काळाच्या तुलनेत आपले अनेक जन्म हा १ क्षणच आहे। म्हणजे आपल्याला अनेक जन्म साधना करावी लागेल हा ही अर्थ यामध्ये अध्याहृत आहे। अनेक जन्म साधना करायची हे ऐकून कोणी करणारच नाही, म्हणून अगोदर रोज फक्त १ क्षण करायला सांगितले। एकदा मनाला आवड लागली कि मनुष्य ती गोष्ट आपोआप करतो। शास्रात ४ प्रकारच्या मुक्तींचा उल्लेख आहे। मुक्ती, मोक्ष म्हणजे दु:खातून, बंधनातून मुक्त होणे। (१) सलोकता (२)-समीपता (३) सरुपता (४) सायुज्यता। सलोकता-वैकुंठ वगैरे लोकांची प्राप्ती समीपता-ईश्वराच्या जवळ असणे, जसे श्रीकृष्ण अर्जुन, श्रीकृष्ण-ऊध्दव देव भक्त प्रत्यक्ष संवाद, बोलणे, एक मनुष्य दुसर्या मनुष्याला भेटतो तसे, सरुपता-देवा सारखेच सगुण रुप धारण करणे असे विविध प्रकारचे विवरण शास्रात आहे। ईच्छेप्रमाणे देवाची भेट। परंतु या चारी मुक्तीं पैकी सायुज्य मुक्ती सर्वश्रेष्ठ आहे। सायुज्यता म्हणजे ईश्वराशी एकरुप होणे। जीव-ब्रम्ह ऐक्य म्हणजे सायुज्य मुक्ती। स्वत: ईश्वर बनणे हेच आपले (अध्यात्माचे) खरे ध्येय आहे। ईश्वराचे नामस्मरण केल्याने भक्ताला ४ ही मुक्ती प्राप्त होतात। तरी सुध्दा तुकाराम महाराज देवाकडे मुक्ती का मागत नाहीत?मला मुक्ती नको, असे का म्हणतात? हा एक चिंतनाचा विषय आहे। “न लगे मुक्ति-धन-संपदा। संतसंग देई सदा”। याचा विचार पुढे केव्हातरी योग्य संदर्भासहित करण्यात येईल।
