
लेखक:- डॉ.गोरखनाथ सुखदेव देवरे ,स्वामी विवेकानंद नगर, नांदगाव (नाशिक)

“देवाचिये द्वारी उभा क्षणभरी। तेणे मुक्ति चारी साधियल्या॥१॥”
!!१!! -ज्ञानदेव हरिपाठ॥ देव या शब्दाचा काही विचार आपण केला। देवाच्या दारात जो क्षणभर उभा राहातो, त्याला ४ मुक्ती प्राप्त होतात। निर्गुण निराकार सर्वत्र व्याप्त ईश्वर, देव त्याचे दार कोणते? जसे मंदिरात जाताना आपण अगोदर मंदिराच्या दरातून जातो, तसे देवाचे ही दार आहे। ज्यातून आपण प्रवेश करतो ते दार। देवाचे दार म्हणजे ईश्वर प्राप्तीचे साधन। संतांनी, शास्रांनी इश्वर प्राप्ती चे अनेक साधने सांगितली आहेत। त्या सर्वांना देवाचे द्वार, म्हटले आहे। उदाहरणार्थ- भावार्थ रामायणात सुमंत प्रधान प्रभू रामचंद्रांना भेटण्यासाठी गेला तेव्हा त्या मंदिराच्या अनेक द्वारांचे श्री नाथ महाराजांनी केले आहे। भावार्थ ते राजभुवन। (१) भावार्थ ते राजभुवन। प्रथम दारवंठा ते श्रवण। दुसरे द्वार ते साधन। नित्यानित्य विवरण ते तिजे॥५१॥ चवथा दारवंठा मनन। पाचवा निदिध्यास जाण। सहावा ते वैराग्य पूर्ण। सातवा जाण साक्षात्कार॥भावार्थ रामायण॥२-५-५२॥ कोणतीही गोष्ट, किंवा ज्ञान प्रथम आपल्याला ऐकावे लागते, संतांकडून ज्ञान आपण अगोदर ऐकतो, त्यामुळे श्रवण हे ईश्वर प्राप्तीचे पहिले दार, साधन। जे ऐकले त्याप्रमाणे साधन केले पाहिजे। तरच अनुभव येईल। त्यामुळे “साधन” हे दुसरे द्वार। जगात काय नित्य व काय अनित्य याचा विचार केला पाहिजे। असा सारासार विचार करणे हे ३ रे द्वार। जे ज्ञान आपण ऐकले व ज्यासाठी साधन करतो आहे, त्याचे पुन्हा पुन्हा चिंतन, मनन केले पाहिजे। त्यामुळे “मनन” हे ४ थे दार। आत्मप्रापीचा जिवाला ध्यास लागला पाहिजे, म्हणून “निदिध्यास” हे ५ वे दार। ६ वे दार -“वैराग्य”। मृत्युलोकापासून तर स्वर्गलोकांपर्यंत च्या सर्व भौतिक सुखांच्या आसक्तीचा पूर्ण त्याग म्हणजे वैराग्य। या ६ दारातून आत गेल्यावर ७ वे दार लागते, ते म्हणजेच “आत्म-साक्षत्कार”।
जे विषे रांधिली रससोये। जे जेवणारा ठाऊवी होये। तै तो ताटचि सांडूनि जाये। जियापरी॥१५-३८॥ ज्ञानेश्वरी. ज्याप्रमाणे एखादा खूप दिवसाचा भूकेलेल्या मनुष्यासाठी पंचपक्वान्नाचे जेवण (स्वयंपाक) तयार केले, पण त्यात विष टाकलेले आहे असे जर सांगीतले तर तो जेवणारा मनुष्य लगेच ते ताट सोडून निघून जातो, त्याच प्रमाणे या संपूर्ण संसारातील (प्रपंचातील) सर्व सुखे नाशिवंत आहेत असे जर पक्के समजले तर संपूर्ण भौतिक सुखांबद्दल मनात सहज वैराग्य प्राप्त होते।
तैसी संसार या समस्ता। जाणिजे जै अनित्यता। तै वैराग्य दवडिता पाठी लागे॥१५-३९॥
द्वार ईश्वरप्राप्तीचे साधन। महत्सेवां द्वारमाहुर्विमुक्ते:। भागवत। संतसेवा। श्रीमद्भागवतात महत्सेवेस (संतांची सेवा) द्वार म्ह्टले आहे। जो ज्ञानाचा कुरुठा। तेथ सेवा हा दारवंठा॥संतांची, महापुरुषांची सेवा करणे हे ईश्वर प्राप्तीचे १ दार म्हणजे साधन आहे।
जो ज्ञानाचा कुरुठा। तेथ सेवा हा दारवंठा। ज्ञानेश्वरी॥४-१६६॥ तद्विध्दि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया। उपदेक्ष्यंति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्वदर्शिनः।।४-३४।। गीता॥ सद्गुरुंना वंदन करुन, जिज्ञासेने प्रश्न विचारून व सद्गुरुंची सेवा करुन अशा ३ उपायांनी सद्गुरुं पासून ज्ञान प्राप्त करता येते। “मौन” हे योगाचे प्रथम द्वार आहे।
“योगस्य प्रथमं द्वारं वाङ्निरोध: ॥”-विवेकचूडामणि-३६९॥ मौन॥ सगुणस्वरुप प्राप्तीचे केवल भक्ती हेच साधन आहे। भक्ती पाविजे व्यक्त। अव्यक्तयोगे॥ज्ञा-१२॥ तरी मी येकेचि परि। आतुडे गा अवधारी। जरी भक्ती येऊनि वरी। चित्ताते गा ॥ज्ञा-११-६८५॥ नामसंकीर्तन सधान पैं सोपे। जळतील पापे जन्मांतरीची॥१॥ न लगती सयास जावे वनांतरा। सुखे येतो घरा नारायण॥२॥ ठायींच बैसोनि करा एकचित्त। आवडी अनंत आळवावा॥३॥ रामकृष्णहरि विठ्ठल केशवा। मंत्र हा जपावा सर्वकाळ॥४॥ याविण असता आणीक साधन। वाहातसे आण विठोबाची॥५॥ तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनि। शाहाणा तो धनी घेतो येथे॥६॥ [१६९८] साधन चतुष्टय-[सिध्दयोग दीक्षा-पेज-४३] योग्य शिष्याचे अंगी आवश्यक असणारे गुण-साधन चतुष्टय- (१)-विवेक (२)-वैराग्य (३)-मुमुक्षत्व (४)-षट् संपत्ती-शम, दम, उपरति, तितिक्षा, समाधान, श्रध्दा। शिष्याचे अंगी हे गुण असले तर गुरु लवकर प्रसन्न होतात। विवेक-जगात सार [अविनाशी] काय आहे व असार[नाशिवंत} काय आहे याचा विचार म्हणजे विवेक। वैराग्य-मृत्युलोकापासून तर स्वर्ग लोकापर्यंतच्या सर्व सुखांचा मनापासून त्याग म्हणजे वैराग्य। कारण स्वर्गसुख सुध्दा नाशिवंत आहे। मुमुक्षत्व- मोक्ष प्राप्तीची तीव्र ईच्छा। शम-मनाचा निरोध, दम-ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये यांच्या अधीन न जाणे, त्यांना आपल्या ताब्यात ठेवणे। उपरति- मनाला विषयासक्ती पासून दूर करणे, अनासक्त राहणे। तितिक्षा- सहनं सर्वदु:खानामप्रतिकारपूर्वकम्। चिंताविलापरहितं सा तितिक्षा निगद्यते। सुखदु:खांना सहन करणे। साधना करतांना कही संकटे आली तरी सहन करणे। या प्रमाणे साधन-चतुष्ट्य याचे स्वरुप आहे। ईश्वर प्राप्तीच्या सर्व किंवा कोणत्याही उपायांना, मार्गांना, साधनांना “देवाचे द्वार” म्हटले आहे। या दारांनी गेल्यावरच देवाची भेट होते।
