
नाशिकरोड (वसंत गोसावी, सिन्नर प्रतिनिधी:) नाशिकरोड येथील योग भवनात पतंजली योगपीठ हरिद्वार आणि पतंजली परिवार महाराष्ट्र पूर्व यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय विशेष बैठक अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. राज्यप्रभाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीस नाशिक शहरातील सर्व प्रभाग तसेच जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील प्रभारी व योगसाधक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भारत स्वाभिमान महाराष्ट्र पूर्व चे राज्य प्रभारी
दिनेश राठोड, पतंजली योग समिती महाराष्ट्र पूर्वचे राज्य प्रभारी अनिल अमृतवार, भारत स्वाभिमान महाराष्ट्र पूर्वचे
सहराज्य प्रभारी कुंडलिक निर्मले,
योगाचार्य गोकुळ घुगे
यांची प्रमुख उपस्थिती लाभली. भारतमातेचे प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात झाली. जिल्हा योग समितीच्या वतीने राज्यप्रभाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. पतंजली योगपीठचे नाशिक जिल्हा प्रभारी मिलिंद गणकर यांनी प्रास्ताविक केले, मीडिया प्रभारी संतोष शिरसाठ यांनी सुत्रसंचलन केले.

“अर्थाविना सर्व व्यर्थ” – दातृत्वाचे महत्त्व
सह राज्य प्रभारी कुंडलिक निर्मले यांनी “अर्थाविना सर्व व्यर्थ” या उदाहरणातून संघटनेतील आर्थिक शिस्त, पारदर्शकता आणि सेवाभावाचे महत्त्व अधोरेखित केले.
राज्य प्रभारी अनिल अमृतवार यांनी संघटना बांधणी, कार्यपद्धती आणि योग शिक्षकांच्या जबाबदाऱ्यांवर सखोल मार्गदर्शन करत सातत्यपूर्ण संवाद व नियोजनबद्ध कार्याची गरज व्यक्त केली.
योगाचार्य गोकुळ घुगे यांनी आपल्या योग प्रवासातील अनुभव कथन करत संघटनेच्या बळकटीसाठी राज्य व केंद्र यांच्यात समन्वय आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.
योग-आरोग्य सेवांचे जागतिक कार्य
मुख्य मार्गदर्शक दिनेश राठोड यांनी पतंजली परिवार हरिद्वारमार्फत जगभर राबविण्यात येणाऱ्या योग-आरोग्य सेवा आणि विविध उपक्रमांची माहिती दिली. वाढत्या प्रदूषण आणि बदलत्या जीवनशैलीमुळे निर्माण होणाऱ्या आरोग्य समस्यांवर योग हे प्रभावी उत्तर असल्याचे त्यांनी सांगितले. संघटना विस्तारासाठी आवश्यक उपाययोजना व योग शिक्षकांच्या महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्यांवर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
बैठकीदरम्यान किसनजी आव्हाड व पुंडलिकजी गांगुर्डे यांना आजीवन सदस्यत्व प्रदान करून राज्यप्रभारांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
राज्य कार्यकारिणी सदस्य ॲड. प्रभाकर खराटे, सुनील गुरगुडे, किसन आव्हाड, शिवनाथ शिंदे, श्रीपत वारुंगसे, वसंत गोसावी, राजेंद्र नन्नवरे, शैलेंद्र शिंदे यांच्यासह निफाड, दिंडोरी, चांदवड, त्र्यंबकेश्वर तसेच सातपूर, सिडको, देवळाली, नाशिकरोड, कामटवाडे, नवीन नाशिक येथील योगशिक्षक व पदाधिकारी उपस्थित होते.नवी दिशा, नवा संकल्प ही विशेष बैठक नाशिक जिल्ह्यातील योग कार्याला नवी दिशा देणारी ठरली असून, आगामी काळात संघटना अधिक सक्षम, संघटित व सेवाभिमुख करण्याचा संकल्प सर्वांनी व्यक्त केला.
योग, संघटन आणि सेवाभाव यांचा संगम साधणारी ही बैठक नाशिक जिल्ह्यातील योग चळवळीला नवी ऊर्जा देणारी ठरली आहे.
