
लेखक:- डाॅ.गोरखनाथ देवरे

॥आत्मा मालिक गुरु ॐ गुरु ओम्॥
हरिपाठ अभंग-१ ” देवाचिये द्वारी ऊभा क्षणभरी। तेणे मुक्ती चारी साधियेल्या॥१॥ हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी॥२॥ असोनी संसारी जिव्हे वेग करी। वेदशास्र उभारी बाह्या सदा॥३॥ ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा। द्वारकेचा राणा पांडवा घरी॥४॥ अभंगाच्या पहिल्या चरणाचा सरळ अर्थ- जो देवाच्या दारात क्षणभर, थोडा वेळ, ऊभा राहातो, त्याला ४ ही मुक्ती प्राप्त होतात। परंतु, प्रत्यक्षात आपण पहातो की, देवाच्या मंदिरात, देवळापुढे अनेक माणसे तासन् तास ऊभे रहातात, पण त्यांना काहीच होत नाही। ४ मुक्ती ही मिळत नाही व देवाचा काही अनुभव ही येत नाही। वरील अभंग खोटा म्हणावा तर हा अभंग ज्ञानेश्वर महाराजांचा आहे। ते खोटे बोलतील का? कारण संतांच्या बाबतीत असे म्हटले आहे की, उदयति यदि भानु: पश्चिमे दिग्विभागे। विकसति यदि पद्मं पर्वताग्रे शीलायां। विचलति यदि मेरु: शीततां याति वन्हि:। न चलति खलु वाक्यं सज्जनानां कदाचन्॥१॥उदयति यदि भानु पश्चिमे दिग्विभागे। ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग ही खोटा म्हणता येणार नाही, व आपला अनुभव सुध्दा खोटा नाही। पण या २ गोष्टी एकमेकांच्या विरुध्द आहेत। मग याचा समन्वय कसा साधायचा? यात खरे काय? हाच वेदातील परोक्षवाद, दिसणारा सरळ अर्थ वेगळा व खरा गूढ अर्थ वेगळा। यावर खूप चिंतन होणे आवश्यक आहे।
कोणत्याही गोष्टीची पूर्ण खात्री झाल्याशिवाय ते मत स्विकारु नये, खरे मानू नये। फक्त ग्रंथात लिहिले आहे म्हणून ते खरे मानावे असे ही नाही। प्रत्येक गोष्टीचा सद्सद्विवेक बुध्दीने विचार केला पाहिजे। त्याबद्दल आपली पूर्ण खात्री सुध्दा पटली पाहिजे। देवांचे गुरु बृहस्पती म्हणतात, “केवलं शास्रमाश्रित्य न कर्तव्यो विनिर्णय:। युक्तिहीनविचारे तु धर्महानि: प्रजायते॥१॥ केवळ शास्रात लिहिले आहे एवढ्यावरच निर्णय घेऊ नये। त्यावर योग्य विचार न केल्यास, धर्माची हानी च होते। त्याचा योग्य विचार करुन, खात्री करुन प्रत्यक्ष अनुभव घेऊनच स्वीकारावे। “गुरु करतांना सुध्दा गुरुं ची नीट पारख करुनच स्वीकारले पाहिजे। जसा गुरुंना शिष्याची पारख करण्याचा अधिकार आहे, तसा शिष्याला सुध्दा गुरूंची पारख करुन स्विकारण्याचा अधिकार आहे। नुसती अंधश्रध्दा म्हणजे अध्यात्म नाही। अध्यात्म प्रत्यक्ष अनुभवावे शास्र आहे। हे तो प्रचितीचे शास्र। “पानी पीना छान के, गुरु करना पहचान के।” असे हि १ संत वचन आहे।
एक वेळ पूर्वेला उगवणारा सूर्य पश्चिमेला उगवेल, कमळ पर्वताच्या शिखरावर उमलेल, मेरु पर्वत जो अचल आहे, तो सुध्दा विचलीत होईल, या सर्व गोष्टी अशक्य आहेत, त्या जरि शक्य झाल्या, तरी सुध्दा संतांचे वचन कधीच असत्य होत नाही। सिध्दांचा प्रत्येक शब्द त्रिकालाबाधीत सत्य असतो। “कथा जप:।-शिवसूत्र॥” सिध्दांच्या मुखातील प्रत्येक शब्द मंत्र च असतो, व तो कधीही असत्य होत नाही। त्यांचे रहस्यमय ज्ञान आपल्या अल्पबुध्दीला आकलन होत नाही, एवढेच। त्यामुळे या अभंगातील रहस्य समजण्यासाठी (१)-देव म्हणजे काय? (२)-देवाचे दार कोणते? (३) अध्यात्मात “क्षण” या शब्दाची व्याख्या काय आहे? (४)-४ मुक्ती कोणत्या? त्यांची एका क्षणात प्राप्ती कशी होते? या अभंगातून ज्ञानेश्वर महाराजांना काय सांगायचे आहे? याचा सविस्तर विचार करणे अत्यावश्यक आहे। त्याचा सविस्तर विचार, चिंतन पुढील प्रक्षेपणात करण्यात येईल।
