
नाशिक:( प्रतिनिधी ) -कवी आपल्या कवितांतून भोगलेले-अनुभवलेले मांडत असतो. त्याची कविता अनुभवण्यासाठी तितकेच संवेदनशील असावे लागते. म्हणूनच संवेदनशीलता असल्याशिवाय कविता कळत नाही, असे प्रतिपादन कवी सुभाष पवार यांनी केले. गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त हुतात्मा स्मारकात आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ या उपक्रमात ‘धुमसते सूर’ या पुस्तकावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बाळनाथ शिंदे होते. सुभाष पवार पुढे म्हणाले की, कवी नेहमी समाज, निसर्ग, वेदना, भावना, माणूस अशा विविध विषयांवर कवी लिखाण करत असतो. पाऊस आणि कवी यांच नातं कधीच संपणारं नाही. म्हणून नदीचा पूर आणि डोळ्यातला अश्रूंचा पूर हे क्षण कवीच्या कवितांमध्ये प्रतिबिंबित होतात, असे सांगून त्यांनी काही कविताही सादर केल्या. अशोक पवार, प्राचार्य यू.के.आहिरे या श्रोत्यांना ग्रंथभेट देऊन सन्मानित करण्यात आले.सुरेश पवार यांनी सूत्रसंचालन तर अशोक पाटील यांनी आभार मानले. दरम्यान येत्या मंगळवारी (दि.८) ‘वसंत व्याख्यानमाला-शतकोत्तर वाटचाल’ या पुस्तकावर श्रीकांत बेणी ऐसपैस गप्पा करणार आहेत.
