
जळगाव निंबायती (वार्ताहर) हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४५ व्या पुण्यतिथीनिमित्त येथील अहिल्यादेवी शिक्षण संस्थेच्या गो. य. पाटील विद्यालयात शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे समन्वयक निंबाजी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव महेंद्र पाटील, सर्व संचालक, विश्वस्त, पदाधिकारी, प्राचार्य पी. एन. पवार, पर्यवेक्षक व्ही. डी. काळे, सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारींसह बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते. मातीच्या कणावर, रयतेच्या मनावर, विश्वासाच्या प्रमाणावर आणि इतिहासाच्या पानावर अधिराज्य गाजवणारे युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांच्या उत्तुंग कार्यातून समस्त भारतीयांच्या ह्रदयात कायम राहतील यात शंका नाही असे गौरवोद्गार यावेळी बोलताना निंबाजी शिंदे यांनी काढलेत. प्राचार्य पी. एन. पवार यांनी विद्यार्थ्यांना ग्रंथालयातून पुस्तके घेऊन शिवचरित्राचा अभ्यास करावा असे आवाहन केले. सूत्रसंचलन प्रा. अमोल अहिरे यांनी केले तर आभार डी. के जगताप यांनी मानलेत.
