
दिंडोरी 🙁 प्रतिनिधी )-ज्ञानवर्धिनी विद्या प्रसारक मंडळ नाशिक आयोजित स्व.बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे व आनंद जोर्वेकर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ नाशिक नगरीत डे केअर सेंटर शाळा येथे बालकवी जिल्हास्तरीय स्पर्धा घेण्यात आली.या स्पर्धेत रयत शिक्षण संस्थेच्या,मा.शरदरावजी पवार माध्य.विद्यालय निगडोळ ता.दिंडोरी या विद्यालयाची विद्यार्थिनी कु.पंकजा सुनील गायकवाड हिने इ.९वी ते १२ वी कुमार गटात काव्यवाचन स्पर्धेत नाशिक जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला.सुप्रसिद्ध साहित्यिक स्वानंद बेदरकर व गझलकार नंदकिशोर ठोंबरे यांच्या हस्ते तिला गौरविण्यात आले.तत्पूर्वी दिंडोरी येथे क्रांतिवीर व्ही.एन.नाईक कला व वाणिज्य महाविद्यालय आणि ज्ञानवर्धिनी शिक्षण प्रसारक मंडळ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा या उपक्रमाचे औचित्य साधून तालुकास्तरीय स्पर्धा महाविद्यालयात घेण्यात आली.या तालुकास्तरीय काव्य स्पर्धेतही कु.पंकजा गायकवाड द्वितीय तसेच कु.भावना भोये तृतीय व कु.समृद्धी सोनवणे उत्तेजनार्थ बक्षीस मिळवून या रयत कन्यांनी विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.या बाल कवयित्रींना विद्यालयाचे मुख्याध्यापक कवी देवदत्त बोरसे व ज्येष्ठ शिक्षक कापडणीस एन.जे. तसेच विद्यालयातील सर्व रयत सेवकवृंद यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.विद्यालयाच्या स्कूल कमिटीचे चेअरमन मा.बबनराव मालसाने व विद्यालयाच्या विविध समित्यांच्या सदस्यांनी या गुणवंत बाल कवयित्रींचे कौतुक केले.निगडोळ पंचक्रोशीतून या बाल साहित्यिकांवर अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे.
