
नांदगाव.(प्रतिनिधी) :- येथील वैजनाथ जिजाजी (तांञिक) विद्यालयात मंगळवार दि.१ एप्रिल २०२५ रोजी असलेल्या १०६ व्या शाळेच्या ‘वर्धापन’ दिनी नाशिक शिक्षण प्रसारक मंडळातर्फे ‘गुरूदक्षिणा’ सभागृहाचे मोठ्या थाटात उदघाटन करण्यात आले. विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक गुरूवर्य श्री. शशिकांत आंबेकर ह्यांच्या सेवानिवृती वर्षात बुधवार दि. १६ आॕक्टोबर २००६ रोजी तत्कालीन लोकसभा अध्यक्ष कै. मनोहर जोशी यांच्या शुभहस्ते भूमीपुजन झालेल्या ‘गुरूदक्षिणा’ सभागृहाचे आज अठरा वर्षानंतर शाळेच्या वर्धापन दिनी थाटामाटात उदघाटन करण्यात आले. ह्यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष मान.श्री. मारूतीराव कुलकर्णी, डाॕ.श्री.भरत केळकर (अध्यक्ष, सर्वसाधारण सभा) मान.श्री. श्रीपादजी देशपांडे (उपाध्यक्ष, सर्वसाधारण सभा), मान.श्री.अश्विनीकुमार येवला (संस्था सचिव), मान.श्री.मिलींद कचोळे (संस्था सहसचिव), मान.श्री. सारंगजी इंगळे (अध्यक्ष,अॕकेडमिक बोर्ड), मान.श्री.श्रीकृष्ण रत्नपारखी( दादासाहेब) आदी मान्यवरांच्या उपस्थितीत गुरूवर्य मान.श्री.शशिकांत आंबेकर ह्यांच्या शुभहस्ते फित कापत व श्रीफळ वाढवत ‘गुरूदक्षिणा’ सभागृहाचे उदघाटन करण्यात आले.

गुरूवर्य मान.श्री. शशिकांत आंबेकर सर एकूण ३७ वर्षांच्या सेवेनंतर दि.३१ मे २००६ रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या कृतज्ञतेचा आदरयुक्त स्नेह उधळणारे अनेक माजी विद्यार्थी,आजी – माजी शिक्षक, हितचिंतक आदींनी सरांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने संधीचा फायदा घेवून एखादे चांगले काम उभे रहावे,अशी सदिच्छा वा मनिषा समोर ठेवत ‘गुरूदक्षिणा’ कक्ष निर्मितीचा जणू संकल्प केलेला होता..,

ज्याची ‘मूर्त परिणती’ म्हणजे माजी विद्यार्थी तथा संस्थेच्या सहभागातून शाळेच्या १०६ व्या वर्धापन दिनी झालेला ‘गुरूदक्षिणा’ कक्षाचा दिमाखदार तथा शानदार उदघाटन सोहळा होय..!! ह्याप्रसंगी नांदगाव शहरातील प्रतिष्ठित नागरीक, ‘गुरूदक्षिणा’ गौरव समितीतील सदस्य, देणगीदार,शाळेचे माजी विद्यार्थी,सर्व माजी शिक्षक,विवीध शाळा-संस्थांचे पदाधिकारी, संकूलातील शाळांचे शालेय समिती अध्यक्ष, मुख्याध्यापक, शहरातील डाॕक्टर्स,इंजिनीअर्स,नांदगाव,मनमाड येथील संस्था सदस्य (फेलोज्) ह्यांचेसह संस्थेतील खजिनदार श्री.अनिल दहीया, सहखजिनदार श्री. हेमंत देशपांडे, श्री. प्रसाद कुलकर्णी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वप्रथम लेझीम, ढोलच्या गजरात विद्यालयातील लेझीम व एन.सी.सी.पथकाने शाळेच्या प्रवेशद्वारावर दुपारी अडीच वा. सर्व मान्यवरांना मानवंदना देत आकर्षक पदललित्याद्वारा स्वागत केले.

श्रीम. सुनिता देवरे, श्री.राजेश भामरे ह्यांचे अनुक्रमे लेझीम व एन.सी. सी.पथकाला मार्गदर्शन लाभले. सर्व प्रमुखअतीथींना मुख्याध्यापक कक्षात शाळेतर्फे कुरकुरीत, गरम समोसा,थंडगार मठ्ठा व पेढे इ.अल्पोपहार स्वरूपात देत सर्वांचे आदरातिथ्यही करण्यात आले.ह्यानंतर गुरुवर्य श्री.शशिकांत आंबेकर ह्यांच्या शुभहस्ते सर्वांच्या उपस्थितीत,साक्षीने शाळेच्या प्रंगणातील ‘गुरूदक्षिणा’ हाॕलच्या भिंतीवरील कोनशिलांचे अनावरण करण्यासह मंगलमय वातावरणात ‘श्रीफळ’ वाढवून शास्ञोक्त मंञोच्चारात पूजन करण्यात आले. ‘गुरूदक्षिणा’ हाॕलच्या प्रवेशद्वारावरील फितीची गाठ सोडवून अधिकृतरीत्या उदघाटनही गुरूवर्य मान.श्री.आंबेकर सर ह्यांच्या शुभहस्ते ह्यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांसमक्ष झाले.ज्ञानदेवता सरस्वती देवीचे पुजन करीत दिपप्रज्वलनही करण्यात आले. ह्यावेळी श्री. ज्ञानेश्वर डंबाळे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वानंद’ उपक्रमातील विद्यार्थ्यांनी मधुर वेणूवादनातुन ईशस्तवन सादर केले. ह्याप्रसंगी माजी शिक्षकांसह उपस्थित सर्वांना १०६ व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा आपल्या प्रास्ताविकातून सेक्रेटरी मान.श्री.अश्विनीकुमार येवला ह्यांनी ह्यावेळी दिल्या. विद्यालयाने आपल्या वाटचालीत असंख्य नावाजलेले विद्यार्थी समाजासाठी घडविल्याचे सांगत शाळेचा ‘लौकिक’ नांदगाव शहारासह नि:संशय पंचक्रोशीतही असुन, सर्वांना प्रिय असलेली तथा ‘जगमान्यता’ मिळालेली शाळा म्हणून व्ही.जे.विद्यालय सर्वञ सुप्रसिद्ध असल्याचे प्रतिपादनही केले. ह्यावेळी त्यांनी शाळेच्या विवीध स्पर्धा परीक्षांतील उज्वल निकाल परंपरेसह स्वानंद उपक्रम तथा शाळेसाठी मेहनत घेणाऱ्या सर्व घटकांविषयी कौतुकास्पद गौरवोद्गारही काढले. श्री. गुलाब पाटील ह्यांनी सर्व मान्यवर अतिथींचा परिचय करून देत मान.श्री.संजीव धामणे ह्यांनी पुष्गुच्छ देत कार्याध्यक्ष मान. श्री. मारुती कुलकर्णी, उपाध्यक्ष मान.श्री. श्रीपाद देशपांडे ह्यांचे स्वागत केले मा. श्री.शशिकांत आंबेकर ह्यांचे मान.श्री. येवला सरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून स्वागत झाले तर मुख्याध्यापक श्री. लक्ष्मीकांत ठाकरे ह्यांनी पुष्पगुच्छ देत श्री. येवला सरांचे स्वागत केले. कार्यक्रमाला उपस्थित इतर सर्व मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापक श्री. ठाकरे ह्यांनी पुष्प देवून ह्यावेळी केले. माजी शिक्षक श्री.भैय्यासाहेब चव्हाण ह्यांनी आपल्या मनोगतातून ‘गुरूदक्षिणा’ सभागृहाच्या जडणघडणीत विविध घटकांचे योगदान, माजी विद्यार्थ्यांची शाळेप्रतीची बांधिलकी, कृतज्ञ भाव,शाळेच्या भौतिक,शैक्षणिक सुविधांसाठी देणगी स्वरूपातील त्यांच्या भरीव योगदानाचे महत्त्वही अधोरेखित केले. ह्यानंतर देणगीदारांसह गुरूवर्य श.ञ्यं.आंबेकर गौरव समितीतील सर्व सदस्यांचे स्वागत पुष्प देत मान.श्री. मारुतीराव कुलकर्णी, मान.श्री.श्रीपाद देशपांडे ह्यांच्या हस्ते करण्यात आले. श्री.भास्कर मधे ह्यांनी यादीवाचन केले. ह्यानंतर ‘गुरूदक्षिणा’ सभागृहाचे बांधकाम पूर्णत्वास नेणारे नांदगावचे बांधकाम ठेकेदार श्री.शमद मन्सुरी ह्यांना ‘गुलाबपुष्प’ देत सेक्रेटरी मान.श्री. येवला सर ह्यांनी त्यांचे स्वागत केले. माजी मुख्याध्यापक व गुरूवर्य मान. श्री.शशिकांत आंबेकर ह्यांनी ‘गुरूदक्षिणा’ सभागृहाच्या यशस्वी पूर्ततेबद्दल समाधान व्यक्त करत ह्याकामी योगदान दिलेल्या संस्थेसह शाळेतील व नांदगाव शहरातील सर्व आजी-माजी घटकांंचे ऋणनिर्देश आपल्या मनोगतातून व्यक्त केले. ह्यांसह सभागृहाचा उपयोग शैक्षणिक उन्नतीसाठी सर्व विद्यार्थ्यांना व्हावा, ह्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी सर्वांना केले. जगात शिक्षकांकडून समाज घडवण्याचे काम ईश्वराने ठरवलेले आहे; त्याबद्दल शिक्षकांनाही जाणीव आहे..; असे जाणीव असलेले ‘संवेदनशील’ शिक्षक नांदगावी व संस्थेतही असल्याने एक नविन,उत्कृष्ट पिढी घडत असल्याचे प्रतिपादन अध्यक्ष मान.श्री.मारुती कुलकर्णी ह्यांनी आपल्या मनोगतातून केले. दान देण्याची वृत्ती शाळेमध्ये निर्माण झालेली आहे तसेच दान वा ‘डोनेशन’ किती दिले..? ह्यापेक्षा ती देण्याची वृत्ती असणे खरोखरच मोठी गोष्ट असून त्या वृत्तीची नांदगावमध्ये बिलकूल कमतरता नसल्याचे मतही श्री.मारुती कुलकर्णी ह्यांनी आपल्या मनोगतातून ह्यावेळी मांडले. ह्यावेळी उस्फूर्तपणे मनमाड येथील राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे माजी सचिव श्री. गुप्ताजी ह्यांनी १९४० च्या दशकात त्यांच्या वडीलांनी ‘क्षणचिञीत’ केलेले व्ही.जे.हायस्कूलच्या मुख्य इमारतीचे बांधकाम सुरू असतांनाचे फ्रेमस्वरूपातील छायाचिञ (Photo) गुरूवर्य श्री.आंबेकर सर ह्यांना वडीलांच्या जुन्या संग्रहातुन आणून खांस भेट म्हणून दिले. पर्यवेक्षक श्री.मिलींद श्रीवास्तव यांनी सर्व मान्यवरांसह उपस्थितांचे शाब्दिक आभार मानले तर ह्या उदघाटन सोहळ्याचे बहारदार सुञसंचलन श्रीम.निवेदिता सांगळे यांनी केले विद्यालयाच्या दोनही सञांतील सर्व शिक्षक- शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.
