
नांदगाव (प्रतिनिधी ) येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नांदगाव येथे महाविद्यालयाच्या ‘राज्यशास्त्र विभाग’ व ‘राष्ट्रीय सेवा योजना’ विभागाच्या वतीने ‘राष्ट्रीय मतदार दिवस’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सदर प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.यु. पाटील यांनी आपल्या मनोगतातून मताधिकार हा पवित्र हक्क असल्याचे नमूद करून मतदारांनी लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी निवडणुकांमध्ये आपल्या मतदानाचा हक्क बजावणे आवश्यक आहे.

यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी समाजात जनजागृती करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना ‘राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त’ मतदान प्रक्रियेत सहभाग घेणे व समाजात जनजागृती करणे संदर्भात शपथ दिली. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ एस.ए.मराठे. यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्याची पार्श्वभूमी,आवश्यकता व महत्त्व यासंदर्भात सविस्तर माहिती दिली. लोकशाही शासन प्रणालीत मताधिकाराला अनन्यसाधारण महत्त्व असल्याने मताधिकार प्राप्त झालेल्या प्रत्येक भारतीय नागरिकाने निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणे गरजेचे असल्याचे सांगितले.
सदर प्रसंगी महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांना ‘निवडणूक आयोगाचा इतिहास’ व ‘मताधिकार-एक आद्य कर्तव्य’ या चित्रफीती दाखविण्यात आल्या. याप्रसंगी मंचावर वरिष्ठ महाविद्यालयाचे प्रा.सी.बी. निगळे,महाविद्यालयाच्या आय.क्यू.ए.सी.चे समन्वयक प्रा.आटोळे, प्रा. खंदारे, प्रा.झनकर, प्रा.श्रीमती धोंडगे, उपस्थित होते.

राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने समाजात जनजागृती व्हावी यासाठी महाविद्यालयाच्या वतीने रॅलीचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. बी.के.पवार यांनी केले. महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने कार्यक्रम व रॅलीसाठी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.डी.डी. ठाकरे, प्रा.गायकवाड, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. बी.एम.अहिरे, प्रा.एस.सी. पैठणकर यांनी परिश्रम घेतले.
