
जळगाव निंबायती (वार्ताहर) नाशिक विभागातील नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, नंदूरबार या पाच जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी येथील उपसंचालक कार्यालयात बुधवारी (दि.२१) आयोजित केलेल्या शिक्षक दरबारात शेकडो शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विविध संघटनांचे पदाधिकाऱ्यांनी शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या, प्रश्न मांडलेत. यावेळी महिलांची संख्या लक्षणीय होती.

दरम्यान एसआयटी चौकशीचे कारण सांगून कामे थोपवले जात असल्याचा आरोप कामगार संघटनांनी केला आहे. विविध शिक्षक संघटना प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आ. किशोर दराडे, शिक्षक उपसंचालक संजयकुमार राठोड, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी सरोज जगताप, उपशिक्षणाधिकारी प्रकाश अहिरे यांच्यासमोर शिक्षकांनी तक्रारींचा पाढा वाचला. दरम्यान आ. किशोर दराडे यांनी उपसंचालक राठोड व शिक्षणाधिकारी दिग्रसकर यांना शिक्षक व कर्मचारी यांच्या सर्व मागण्या २८ फेब्रुवारी पर्यंत तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना केल्या. शिक्षकांच्या भावना अत्यंत तीव्र असल्यामुळे सभेने उग्र स्वरूप धारण केले. उपसंचालक कार्यालयातून आमदारांनी वॉक आऊट करून समोरील मैदानावरती ठिय्या दिला. प्रसंगी नाशिकरोड पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण मिळवले.
यावेळी उपस्थितांनी शालार्थ आयडी, शिक्षक मान्यता, पुरवणी बीले, अंशतः अनुदानित कर्मचाऱ्यांच्या समस्या, एक स्तर समस्या, कला शिक्षकांच्या समस्या, सेवा सातत्य, बदली मान्यता आदी समस्या मांडल्यात. प्रसंगी मुख्याध्यापक संघाचे एस बी देशमुख, प्रदीप सांगळे, गोरख कुनगर, शिक्षक सेनेचे संजय चव्हाण, एम के वाघ टीडीएफचे मोहन चकोर, त्रंबक मार्कंड, शिक्षक परिषदेचे विजय बडे, प्रा. अमोल अहिरे, कास्ट्राईब संघटनेचे निलेश गांगुर्डे, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे सोमनाथ धात्रक या सर्वांनी चर्चेत सहभाग घेऊन विविध विषयांवर ती चर्चा केली.
