
नाशिक–पुणे हायस्पीड रेल्वे हा प्रकल्प सिन्नर–संगमनेर–नारायणगाव–मंचर–राजगुरुनगर–चाकण या नैसर्गिक, औद्योगिक व लोकाभिमुख मार्गानेच गेला पाहिजे, या ठाम मागणीसाठी नाशिक–पुणे रेल्वे कृती समितीच्या वतीने 31 जानेवारी रोजी गोंदे फाटा येथे समृद्धी महामार्ग व नाशिक–पुणे महामार्गावर तीव्र रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
या संदर्भात आज नाशिकचे जिल्हाधिकारी मा. आयुष प्रसाद यांना निवेदन देऊन प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. यावेळी कृती समितीने स्पष्ट शब्दांत सांगितले की, हा प्रकल्प चुकीच्या मार्गाने नेण्याचा कोणताही प्रयत्न नाशिक जिल्ह्यावर अन्याय करणारा ठरेल आणि तो कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही.
सदर हायस्पीड रेल्वे ही उद्योजक, पुण्यात शिक्षणासाठी जाणारे हजारो विद्यार्थी, आयटी क्षेत्रातील युवक, व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांसाठी जीवनवाहिनी ठरणार आहे. या मार्गाने रेल्वे गेल्यास पुणे अवघ्या पावणे दोन तासांत गाठता येणार असून, रोजगार, उद्योग, शिक्षण व आर्थिक विकासाला अभूतपूर्व चालना मिळणार आहे. मात्र काही निवडक घटकांच्या दबावाखाली लोकहिताला डावलण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
सिन्नर–संगमनेर–नारायणगाव–मंचर–राजगुरुनगर–चाकण हा मार्ग भौगोलिकदृष्ट्या योग्य, लोकसंख्येने समृद्ध व औद्योगिकदृष्ट्या सक्षम असून, हा मार्ग डावलणे म्हणजे लाखो नागरिकांच्या भविष्यासोबत खेळण्यासारखे आहे. जर सरकारने व प्रशासनाने वेळीच निर्णय घेतला नाही, तर आंदोलनाची धार अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही कृती समितीने दिला आहे.
निवेदन देताना हरिभाऊ तांबे, भाऊसाहेब शिंदे, प्रा. राजाराम मुंगसे, विठ्ठल जपे, राजाराम मुरकुटे, आनंदा सालमुठे ,संदीप उगले यांच्यासह नाशिक–पुणे रेल्वे कृती समितीचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकहिताच्या या निर्णायक लढ्यात सर्व नागरिक, उद्योजक, विद्यार्थी व संघटनांनी सहभागी व्हावे, असे आवाहन नाशिक–पुणे रेल्वे कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
— नाशिक–पुणे रेल्वे कृती समिती सिन्नर
