
पिंपरी हवेली (प्रतिनिधी ) पिंपरी हवेली येथील डोंगरमाथा जिल्हा परिषद शाळेत मकर संक्रांत सणाचे औचित्य साधून महिलांचा हळदी- कुंकवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.याप्रसंगी शाळेच्या वतीने महिलांना अल्पोपहार तसेच भेटवस्तू देण्यात आली.महिलांची संगीत खुर्ची स्पर्धा घेण्यात आली.सदर स्पर्धेत सर्व महिलांनी अत्यंत चुरशीने व आनंदाने सहभाग घेतला.स्पर्धेत प्रथम व द्वितीय येणाऱ्या महिलांना त्यांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक साहित्य भेटवस्तू म्हणून देण्यात आली. याप्रसंगी महिलांनी आपल्या बंजारा समाजातील लोकगीतांवर ठेका धरत लोकनृत्य सादर केले.उपस्थितांनी त्यांच्या नृत्याचे व संपूर्ण कार्यक्रमाचे कौतुक करून शाळेस धन्यवाद दिले,व यापुढेही असे समाज विधायक उपक्रम शाळेने राबवून आपली संस्कृती जोपासावी असे मत व्यक्त केले.

उपशिक्षिका नूतन ठाकरे मॅडम यांनी हिंदू संस्कृतीतील सणाचे महत्व समजावून दिले,तर मुख्याध्यापक कल्याण पाटील सर यांनी शाळेतील विविध समस्या,विद्यार्थी उपस्थिती, गुणवत्ता,शाळेत राबवत असलेले विविध उपक्रम यांचा आढावा घेतला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक कल्याण पाटील सर यांनी केले,तर उपशिक्षक रामचंद्र पाटील सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
