
नाशिक:-(प्रतिनिधी ) बालपणापासून आध्यात्मिक वातावरणात जडणघडण झाली. तसेच काही घटनांमुळे संघर्षही करावा लागला. अशा अध्यात्म व संघर्ष यातून जीवन घडत गेले, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मुक्तेश्वर मुनशेट्टीवार यांनी केले. गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त हुतात्मा स्मारकात आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ या उपक्रमात ‘चळवळ्या माणूस’ या पुस्तकावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक सोमनाथ साखरे होते. श्री.मुनशेट्टीवार पुढे म्हणाले की, संत गाडगेबाबा यांच्या सोबत साफसफाई करण्याचा अनुभव तर दुसऱ्या बाजूला आमच्या गावी घराला लागलेल्या आगीत घर जळाले. त्यातून जीवनाचा संघर्ष सुरू झाला. डॉ.आंबेडकर यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. लाखो लोकांमध्ये भाषण ऐकण्याचा क्षण आयुष्यात संघर्ष करण्यासाठी प्रेरणादायी ठरला. जनतेचा पाठिंबा असला तरच चळवळी उभारता येतात. विविध चळवळीत सक्रिय सहभाग घेतल्याने ‘चळवळ्या माणूस’ ही पदवी मिळाली, असेही ते म्हणाले. सुहास टिपरे आणि राजेंद्र देसले या भाग्यवान विजेत्यांना ग्रंथभेट देऊन सन्मानित करण्यात आले. सुरेश पवार यांनी सूत्रसंचालन केले तर दतात्रय कोठावदे यांनी आभार मानले. दरम्यान येत्या शुक्रवारी (दि.४) कवी सुभाष पवार ‘धुमसते सूर’ या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करणार आहेत.

