
नाशिक:(प्रतिनिधी)- उत्तर महाराष्ट्राचा मानाचा स्तंभ असलेल्या गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या गिरणा गौरव आणि जीवनगौरव पुरस्कारांचे वितरण शनिवार दि.५ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता महाकवी कालिदास कलामंदिर येथे होणार असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार यांनी कळवले आहे. दर पाच वर्षांनी देण्यात येणारा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ रंगकर्मी आणि महाराष्ट्रभूषण अशोक हांडे यांना प्रदान केला जाणार आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या या सोहळ्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कोकण विभागीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी, वसई-विरार महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.अनिल पवार, माजी आ.नानासाहेब बोरस्ते, पद्मश्री चैत्राम पवार, ज्येष्ठ वारकरी सांप्रदायिक आणि प्रगतिशील शेतकरी त्र्यंबकनाना वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्काराचे वितरण होणार असल्याची माहिती सुमंगल उद्योग समूहाचे चेअरमन संजय अण्णा हिरे यांनी दिली. यंदाचे हे सव्वीसावे वर्ष असून पद्मश्री राहीबाई पोपेरे, गीतकार बाबासाहेब सौदागर, पोलीस उपायुक्त डॉ.मोनिका राऊत, सह्याद्री उद्योग समूहाचे चेअरमन विलास शिंदे, लेखक तुमच्या भेटीला उपक्रमाचे प्रणेते वसंत खैरनार, सुप्रसिद्ध दंतरोगतज्ज्ञ डॉ.भूषण पाटील, साहित्यिक आणि सुप्रसिद्ध सूत्रसंचालक रवींद्र मालुंजकर, कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती धनंजय पवार, गायक-संगीतकार संजय गीते, सावानाचे जयप्रकाश जातेगावकर, नाट्यदिग्दर्शक सचिन शिंदे, उद्योजक संदीप मांडवडे, सामाजिक कार्यकर्ते यशवंत पवार, प्राचार्य डॉ.बी.जी वाघ, प्रगतशील शेतकरी विनोद जाधव यांना यंदाचा गिरणा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तसेच नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ.रवींद्रकुमार सिंघल, कोकण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.संजय दराडे, नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांना राष्ट्रपती पदक मिळाल्याबद्दल तसेच छ.संभाजीनगरचे जिल्हाधिकारी डॉ.दिलीप स्वामी यांनी निवडणूक काळात गतिमान प्रशासक म्हणून कामगिरी केल्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन गिरणा गौरव प्रतिष्ठानसह महाराष्ट्र राज्य गिरजा महिला मंच, पुस्तकावर बोलू काही टीमच्या वतीने करण्यात आले आहे.
