
नाशिक ( प्रतिनिधी) सांस्कृतिक, नैतिक, भौतिक आणि आध्यात्मिक दृष्टीने समाज विकसित करण्यात रामराज्य अधिक प्रभावी होते. आदर्श राजनीतीचा मानदंड म्हणजे रामराज्य असे प्रतिपादन डॉ. कल्याण कुलकर्णी यांनी केले.
गिरणा गौरव प्रतिष्ठान च्या वतीने हुतात्मा स्मारक येथे आयोजित पुस्तकावर बोलू काही या अभिनव उपक्रमात २१७ पुष्प गुंफताना डॉ. कल्याण कुलकर्णी रामराज्य या पुस्तकावर बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योगाचार्य अशोक पाटील हे होते.
डॉ. कल्याण कुलकर्णी पुढे म्हणाले की, प्रभूराम कुशल प्रशासक व आदर्श कुटुंब व्यवस्था समाज व्यवस्था शासन व्यवस्था, अर्थव्यवस्था, समाज हित, प्रेम व एकता यांचं सम्यक दर्शन घडवणारे युगपुरुष होते. त्यामुळे राम राज्यातील निस्पृह प्रामाणिक आणि प्रभावी प्रशासन यंत्रणा प्रबळ होती. कर्तव्यदक्ष कारभार काटेकोरपणे केला जात होता.
रामराज्यात संपन्नता आणि नैतिकता हे दोन राष्ट्राचे मजबूत स्तंभ भक्कम उभे होते. याची जाणीव प्रत्येकाला होत असे. राम काळात सार्वजनिक कामे पुण्य लाभावे म्हणून केली जात होती. त्यासाठी सढळ हाताने मदत करणारेही पुढे येत होते. राजनीति आणि शाश्वत नैतिक मूल्यांचे वर्चस्व रामराज्यात होते. आजच्या सारखी लोकशाही त्या काळात नव्हती.कुटुंबीय व्यवस्था,शिक्षण व्यवस्था, ही सामाजिक ऐक्य आणि हित साधणारी असल्यामुळे विचारांचा संस्कार आणि आदर्श कुटुंब व्यवस्थेचा पाया हे खरे शिक्षण
रामराज्यात होते. तसेच स्री शिक्षणातून निर्माण झालेले संस्कार, नीती, भावना, विद्या आणि विनय हे गुण जपले जात होते. रामराज्य विषयी प्रेम,कौटुंबिक एकता, आत्मियता आणि समर्पण या गोष्टी नक्कीच आदर्शवत आहेत.
यावेळी अजित कुलकर्णी, केशव मोरे या भाग्यवान विजेत्यांना ग्रंथ भेट देऊन सन्मानित करण्यात आले. सुहास टिपरे यांनी आभार मानले. सुरेश पवार यांनी सूत्रसंचालन केले.
दरम्यान येत्या मंगळवारी (१३) संतोष हुदलीकर आपल्या ‘फंटुस गाणी’ या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करणार आहेत
