नाशिक:(प्रतिनिधी)- ऐकलेल्या गाण्याचा आपल्या मानसिकतेवर परिणाम होत असतो. आशयसंपन्न आणि उत्तमोत्तम गाणी ऐकल्यास त्याचा आपल्या मनावर सकारात्मक परिणाम होतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ.कैलास कमोद यानी केले.
गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या वतीने हुतात्मा स्मारकात आयोजित 'पुस्तकावर बोलू काही' या अभिनव उपक्रमात २१६वे पुष्प गुंफताना डॉ.कैलास कमोद 'भवरे की गुंजन' या पुस्तकावर ऐसपैस गप्पा मारत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक माजी आ.नानासाहेब बोरस्ते होते.
डॉ.कमोद पुढे म्हणाले की, माणसाच्या आयुष्याची खोली कधी कुणाला समजली नाही आणि समजणार नाही. कधी सुख तर कधी दुःख हा नियतीचा खेळसुद्धा नेमका किती दिवस आणि कसा चालणार; हे कधीच कोणाला माहीत नसते. गीतांच्या माध्यमातून हा विचार व्यक्त करण्याचा प्रयत्न या पुस्तकात करण्यात आला आहे. 'ये दुनिया ये मैफील मेरे काम की नही, जिंदगी कैसी ये पहेली है, ए कहा आ गये हम, साथी हात बढाना, चलो दिलदार चलो, सत्यम शिवम सुंदरम, दिस येतील दिस जातील, भातुकलीच्या खेळामध्ये, उषःकाल होता होता काळरात्र झाली...' अशा अनेक गीतांचा अर्थ आणि अनेक गीतांचा अभ्यास करून त्याचे विविध पदर उघडून वाचकांना गाण्यातली सौंदर्यस्थळं दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न या पुस्तकातून करण्याचा प्रयत्न केला आहे. गाण्याकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन निर्माण व्हावा आणि गाण्याचा आस्वाद घेऊ पाहणाऱ्या वाचकांचं गाण्याशी नातं जुळावं, असा विचार मांडला आहे, असेही ते म्हणाले.
संजीवनी पाटील आणि मुक्ता चिधंडे यांना ग्रंथभेट देण्यात आली. प्रा.सुरेश पाटील यांनी आभार मानले तर सुरेश पवार यांनी सूत्रसंचालन केले. दरम्यान येत्या शुक्रवारी (९) 'रामराज्य' या पुस्तकावर डॉ.कल्याण कुलकर्णी ऐसपैस गप्पा करणार आहेत.