
नाशिकरोड:- अखिल भारतीय चैतन्य साधक परिवाराच्या नाशिक शाखा समितीने गतवर्षीप्रमाणे याही वर्षी भव्य श्री गीता रामायण सत्संग सोहळ्याचे आयोजन ४ ते ६ एप्रिल या कालावधीत तपोवनातील राष्ट्रसंत श्री जनार्दन स्वामी आश्रमात केले आहे. प.पू.संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी यांनी स्थापन केलेल्या चैतन्य साधक परिवार , जळगाव जिल्ह्यातील श्री वृंदावन धाम, पाल (ता.रावेर) या आश्रमाच्या माध्यमातून गौशाळा, गुरुकुल, आरोग्य शिबिर, ध्यान साधना, साधना शिबिर, भक्ती सभा इत्यादींचे आयोजन केले जाते. ४ आणि ५ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता सत्संग सोहळा आणि महाप्रसाद होईल. ६ एप्रिल रोजी सकाळी ७.३० वाजता भव्य शोभायात्रा आणि सकाळी १० वाजता सत्संग सोहळा आणि महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल. सर्व ग्रंथांचा सार श्रीमद भगवतगीता आहे. यावर परमपूज्य बापूजी भाष्य करीत. श्रीमद् भगवतगीता प्रमुख ग्रंथ मानून याबरोबरच श्रीरामायण, श्रीमत भागवत, महाभारत, उपनिषद श्रीरामचरितमानस, भारतातील सर्व संतांची ग्रंथसंपदा आणि विचार मुखोदगत असणारे प.पू.बापूजी आणि त्याच्यानंतर हाच वारसा पुढे चालवणारे आश्रमाचे गादीपती तथा महाराष्ट्र संत समितीचे प्रदेशाध्यक्ष श्रद्धेय संत श्री गोपाल चैतन्यजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणाऱ्या श्री गीता रामायण सत्संग सोहळ्यात नाशिक नगरीतील साधक आणि भगवंत प्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन अखिल भारतीय चैतन्य साधक परिवारच्या नाशिक समितीने केले आहे.
