
लोहोणेर-: येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालयात थोर समाजसुधारक व संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका के. ए. शिंदे होत्या तर व्यासपीठावर पर्यवेक्षक व्ही. एम. निकम उपस्थित होते. प्रास्ताविक सांस्कृतिक समिती प्रमुख सुनिल एखंडे यांनी केले. त्यांनी संत गाडगेबाबा यांच्या स्वच्छतेविषयीचे विचार, अंधश्रद्धा निर्मूलन, श्रमप्रतिष्ठा व समाजसेवेचे महत्त्व यावर प्रकाश टाकला. यावेळी इयत्ता सहावीची विद्यार्थिनी तेजल सूर्यवंशी हिने आपल्या मनोगतात संत गाडगेबाबा यांनी हातात झाडू घेऊन समाजाला स्वच्छतेचा संदेश दिला, दानधर्मापेक्षा शिक्षण व स्वावलंबनावर भर दिला, असे सांगत विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांचे अनुकरण करावे, असे मत व्यक्त केले. तसेच इयत्ता आठवीचा विद्यार्थी श्रेयस चौधरी याने संत गाडगेबाबा यांच्या समाजकार्याचा आढावा घेत अंधश्रद्धा, व्यसनमुक्ती व सामाजिक समतेसाठी त्यांनी केलेल्या कार्याचे महत्त्व अधोरेखित केले. यानंतर शिक्षक एम. जी. भामरे यांनी आपल्या मनोगतात संत गाडगेबाबा यांच्या जीवनकार्याची सविस्तर माहिती देत समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता व दारिद्र्याविरुद्ध त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला, असे सांगितले. हातात झाडू घेऊन गावोगावी स्वच्छतेचा संदेश देणारे गाडगेबाबा हे खरे समाजप्रबोधक होते असे सांगितले. अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापिका के. ए. शिंदे यांनी संत गाडगेबाबा हे केवळ संत नव्हते तर समाजपरिवर्तनाचे दीपस्तंभ होते,असे सांगत त्यांच्या कार्याचा आदर्श विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनात घ्यावा, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक समितीच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर सेवकांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन सांस्कृतिक समिती प्रमुख सुनिल एखंडे यांनी केले.
फोटो ओळ-: लोहोणेर येथील जनता विद्यालयात संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमापूजन करून पुष्पहार अर्पण करताना मुख्याध्यापिका के. ए. शिंदे, पर्यवेक्षक व्ही. एम. निकम समवेत उपस्थित शिक्षक व शिक्षकेत्तर सेवकवृंद. (छाया : सुनिल एखंडे)
