“माणसं उपकारातून तर देवमाणसं परोपकारातून समाजाला परिचित होत असतात.”
लेखक-प्राचार्य देवदत्त बोरसे
रयत शिक्षण संस्थेचे,
मा.शरदरावजी पवार माध्य.विद्यालय
निगडोळ ता.दिंडोरी जि.नाशिक.
मो.नं.९४२१५०१६९५.

प्रवचनातुन विचारांची धूळ उडविणारे समाजात तसे असंख्य असतात परंतु तेच विचार आपल्या आचरणातून प्रवाहित करून समाजमन निर्मळ करणारे कर्मपरायण थोडेच असतात अशा महापुरूषांमध्ये अभिमानानं नांव घ्यावं असं व्यक्तिमत्त्व म्हणजे राष्ट्रसंत गाडगेबाबा होय.महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे.संत परंपरेचा वारसा जपणाऱ्या या भूमीत वऱ्हाडातल्या अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील शेणगांव अंजनगांव सुर्जी या छोट्याश्या गावांत झिंगराजी व सखुबाई जाणोरकर या परीट समाजाच्या दांपत्याच्या पोटी २३ फेब्रुवारी १८७६ रोजी एक नररत्न जन्माला आलं..त्याचं नांव आई सखुबाईनं डेबुजी ठेवले.घरी अठराविश्व दारिद्रय अनं झिंगराजी हा पुर्ण व्यसनाधीन होता आणि व्यसनातच त्याचं निधन झालं..लहानग्या डेबुजीला आई सखुबाईनं तिच्या माहेरी मुर्तिजापुर तालुक्यातील दापुरे येथे मामांकडे ठेवले.डेबुच्या मामांची चांगल्यापैकी शेतजमीन व गुरेढोरे होती.मामानं त्या गुराढोरांना चारण्याचं काम डेबुजीला दिले.अज्ञानाच्या अजगरमिठीत असलेला बहुसंख्य समाज हा त्या काळात कर्जामुळे सावकारशाहीच्या पाशात अडकलेला होता.कर्जाची व व्याजाची परतफेड न केल्यामुळे सावकार शेतकऱ्यांच्या शेतात जावून पिकलेल्या धान्यातून मोठा वाटा उचलून नेत असत,त्यामुळे शेतकऱ्यांच्या वाट्याला पुरेसं धान्य शिल्लक राहत नसे.सावकारांची ही जबरदस्ती व शेतकऱ्यांवरील अन्याय डेबुजीला सहन होत नसे.या धान्याच्या वादावरून असेच एकदा डेबुचे व सावकाराचे भांडण झाले.शेतातच सावकाराला डेबुजीने झोडपले.यामुळे मामा नाराज झाला.पुढे मामाच्या निधनानंतर डेबु आई सखुबाईकडे परतला.१८९२ साली डेबुजीचं लग्न झालं.त्यांना चार मुली व एक मुलगा झाला.परंतु भगवान गौतम बुद्धांप्रमाणे ते फार काळ संसारात रमले नाहीत.बालपणापासुनच स्वच्छता व समाजसेवेची आवड असलेल्या डेबुजींनी १ फेब्रुवारी १९०५ रोजी घरसंसार त्यागून समाजसेवा,जनजागृती व स्वच्छता कार्यास स्वःतला वाहून घेतले.त्यांनी महाराष्ट्रभर तीर्थाटन केले,गांवोगांव ते फिरले.समाजात भीषण दारिद्रय,अज्ञान,उपासमार,कर्मकांड,अंधश्रद्धा आणि अस्वच्छता त्यांना दिसली.देव दगडात नसून माणसात आहे,याचा बोध त्यांना झाला.डेबुजी हातात खराटा घेऊन दिवसा नित्य एखाद्या गावातली घाण साफ करत आणि रात्री किर्तनातून समाजप्रबोधन करुन लोकांच्या मनातली घाण साफ करत.वर्तनातून ग्रामस्वच्छता व किर्तनातून मन स्वच्छता करणाऱ्या या अवलियाचा पेहरावही जगावेगळा होता,अंगावर रंगीबेरंगी ठिगळं लावलेला सदरा,एका कानात कवडी तर दुसऱ्या कानाच्या पाळीत फुटलेल्या बांगडीची काच,डोक्यावर फुटलेल्या मडक्याचे गाडगे अश्या त्यांच्या या अवतारामुळे लोक त्यांना गाडगेबाबा म्हणत असतं,बाबा स्वतः शिक्षण घेऊ न शकल्याची त्यांना खंत होती म्हणून त्यांनी लोकांना शिकण्याचा संदेश आपल्या किर्तनातून दिला..”तीर्थी धोंडापानी,देव रोकडा सज्जनी.”असे ते म्हणत..प्रसंगी दागिने-भांडी मोडा पण मुलांना शिकवा असा त्यांचा लोकांना आग्रह असे.गाडगे बाबांच्या किर्तनाला प्रचंड जनसमुदाय जमत असे.बाबा प्रश्नोत्तराच्या माध्यमातुन लोकांशी संवाद साधून त्यांना जागृत करत असत.पंढरपुरच्या यात्रेला ते दरवर्षी जात परंतु विठ्ठल-रखुमाईच्या मंदीरात दर्शनासाठी न जाता चंद्रभागा नदीत लोकांनी टाकलेली घाण, निर्माल्य काढून ती स्वच्छ करत असत.त्यांच्या स्वच्छता कार्यानंतर तेथे जमलेले भाविक रात्री त्यांच्या किर्तनाला आवर्जून हजर राहत असत.बाबा “गोपाला ! गोपाला ! देवकीनंदन गोपालाचा गजर करुन किर्तनाला जमलेल्या समुदायाला प्रश्न विचारायचे की,
तुमचा देव कुठे राहतो ?
लोक सांगायचे तो देवळात राहतो.
बाबा म्हणायचे तुमचा देव देवळात राहतो पण माझा देव मात्र मला माणसात दिसतो.
मग बाबा लोकांना विचारायचे की तुमच्या देवाला आंघोळ अनं वस्त्र कोण घालतो ?
लोक म्हणायचे,आम्हीच घालतो जी !
बाबा हसायचे अनं म्हणायचे,अस्स ! तुमच्या देवाला स्वतःची आंघोळ करता येत नाही अनं कपडे घालता येत नाही मग तो तुमच्या अंगाला मग वस्त्र कसं देणार.
बाबांचा लोकांना पुढचा प्रश्न राहायचा,तुमच्या देवाच्या देवळात दिवा कोण लावतो ?
लोकांपैकी कुणीतरी सांगायचे की,आम्हीच दिवा लावतो.
बाबा त्यांना प्रतिप्रश्न विचारायचे,जर तुमच्या देवाला स्वतःच्या देवळात उजेड करता येत नाही मग तो तुमच्या जीवनात कसा प्रकाश निर्माण करणार ?
बाबांचे पुढचे प्रश्न असायचे तुमच्या देवाला अन्न कोण ठेवतं आणि त्याला तुम्ही देवळात ठेऊन दाराला कलुुप का लावता ?
कुणीतरी सांगायचे की देवाला नैवद्य आम्हीच ठेवतो तो कुत्र्या-मांजरानं खाऊ नये व देवाचे दागिने चोरी होऊ नये म्हणुन आम्ही देवळाला कुलुप लावतो.
बाबा लोकांच्या अज्ञानाची बरोबर नस पकडुन त्यांना जागे करायचे,अरे ! तुमच्या देवाला अन्न स्वतःच्या हाताने खाता येत नाही तो काय तुम्हाला अन्नधान्य देणार..त्याला स्वतःच्या दागिन्यांचं रक्षण करता येत नाही तो तुमचे कसं रक्षण करेल?
अशाप्रकारे लोक आपल्या अज्ञानावर गाडगेबाबांच्या प्रश्नांच्या भडीमाराने खजील व्हायचे.मग गाडगेबाबा त्यांना सांगायचे की,
तुम्हाला माझा देव माहित आहे का?
माझा देव बोलतो तसा वागतो,तो गोरगरीबांच्या लेकरांसाठी जागतो,त्यांना शिकवितो,त्यांना खाऊ घालतो,त्यांच्यासाठी झिजतो.तो सदैव माझ्या मनात असतो.
लोक आश्चर्यानं बाबांना विचारायचे,कुठे आहे तुमचा देव ?
गाडगेबाबा आपल्या पाठीमागे उभ्या असलेल्या उंच,धिप्पाड व तेजपुंज दाढीधारी माणसाकडे अंगुलीनिर्देश करुन सांगायचे,हे आहेत माझे देव कर्मवीर भाऊराव पाटील हे रयत शिक्षण संस्थेत गरीब,शोषित,पिडीत अनं वंचित समाजाच्या मुलांना शिकवितात आणि जीवनात घडवून त्यांना उभे करतात..तुमचं दान त्या निर्जीव देवाच्या दानपेटीत टाकण्यापेक्षा या माझ्या सजीव देवाच्या झोळीत टाकून खरं सत्कर्म करुन पुण्य कमवा.
अशाप्रकारे झोपलेल्या समाजाला जागं करण्याचं काम संत गाडगेबाबांनी केले.त्यांनी नाशिक,देहु,आळंदी,पंढरपुर या ठिकाणी गोरगरीबांना राहण्यासाठी धर्मशाळा बांधल्या,अन्नछत्र सुरु केले,घाट बांधले आणि रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांना शैक्षणिक कार्यासाठी लाखो रुपयांची देणगी दिली.भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरही गाडगेबाबांचे ज्ञानप्रबोधक किर्तन आवडीने ऐकत असतं.त्यांचा दोघांचा वैचारीक ऋणानुबंध घट्ट होता.आयुष्यभर स्वच्छता अभियान राबविणारा,अंधश्रद्धा अनं कर्मकांडावर शब्दांचे आसूड ओढणारा,शिक्षणाचा विचार रुजविणारा आणि माणसांत देव शोधून माणसं जोडणारा निष्काम कर्मयोगी २० डिसेंबर १९५६ रोजी वऱ्हाडातील वलगांव येथे पेढी नदीपात्रात ईहलोकात थोर मानवतावादी कार्य करुन अनंतात कायमचा विलिन झाला.
अशिक्षित असूनही शिक्षित मेंदुंना सुशिक्षित करणाऱ्या महाराष्ट्राच्या या विज्ञानवादी राष्ट्रसंताच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.
