
महेश कळसाईत
ग्रामीण प्रतिनिधी इंदापूर
डॉ. संदीप वाकडे लिखित "वाडा" या कादंबरीतील मुख्य नायिका 'संध्या' स्वतःच्या आयुष्याची शिक्षणावाचून झालेली परवड यातून सांगत आहे. ही कादंबरी वाचताना संध्या जणू आपल्यासमोर बसून ही कहाणी सांगत आहे असं वाटतं. कादंबरीतील प्रत्येक पात्र लेखकाने अतिशय मार्मिक शब्दात उतरवलेले आहे. प्रत्येक पात्राला अतिशय समर्पक बोलीभाषेत न्याय दिला आहे. पुस्तक वाचताना आपल्यासमोर प्रत्येक व्यक्तीरेखा उभी राहते आणि ती जणू आपल्यातीलच एक अभिव्यक्ती आहे कि काय असे वाटते.
समाजात असणाऱ्या अनेक रूढी आणि परंपरा यासाठी प्रत्येक वेळी फक्त स्रीचाच कसा बळी जातो, याचे उदाहरण म्हणजे ही कादंबरी होय. कादंबरीची नायिका स्वतःच्या शिक्षणाचं स्वप्न समाजाच्या आडमुठेपणामुळे पूर्ण करू शकत नाही. जन्माला आल्यापासून तात्याच्या मनात मुलगी असल्याच्या रागामुळे तिचा त्याच्याकडून झालेला रागराग ते तिचे लग्न झाल्यानंतरही ती आपल्या मुलीचं शिक्षणाचं स्वप्नं पूर्ण करू पाहत आहे, म्हणून तिच्या नवऱ्याने म्हणजे भिवाने केलेला तिचा रागराग. एकूणच जन्म, बालपण, शिक्षण, लग्न या सगळ्या प्रवासात संध्याच्या वाट्याला कमालीचा संघर्ष आलेला आहे. शिक्षणासाठी बापाशी लढणं, आईवडिलांना सोडून आज्जीजवळ राहणं. आई आपल्या सोबत आहे या विश्वासाच्या जोरावर ती सातवीपर्यंत शिक्षण घेते. पण त्यानंतर तिचं लग्न होतं. समाजातील रूढी परंपरांच्या नावाखाली संध्याचं शिक्षणाचं स्वप्न पायदळी तुडवले जाते. पण त्याची त्यांना जराही खंत नव्हती. आपल्यापेक्षा जास्त शिकलेली, विचारांनी परिपक्व, प्रगल्भ असणारी स्री समाज सहजपणे कशी काय मान्य करेल? हा प्रश्न मनाला सहज स्पर्श करून जातो.
लेखकाने प्रत्येक प्रसंग अतिशय डोळसपणे इथे मांडलेले आहेत. लग्नानंतर अचानकपणे आलेली संसारची जबाबदारी, आणि परिस्थिती यांच्याशी संध्या दोन हात करत झगडत असते. अशातच तिला मातृत्वाची चाहूल लागते आणि वेगळं घर बनवण्याची वेळ येते. कधी कधी आपलं नशीब आपल्या कोणत्या कोणत्या परीक्षा घेत असते, हेच समजत नाही. पण अशा परिस्थितीत लेखकाने वाचकांना अतिशय सुखद धक्का दिला आहे तो म्हणजे रक्ताचे नसले तरीही स्वभावाने खूप प्रेमळ असे आज्जी आजोबा संध्याच्या आयुष्यात आणले आहेत. तिच्यासाठी ते किती पराकोटीच्या गोष्टी करतात हे पुस्तक वाचून समजते. फिरतीचं आयुष्य वाट्याला आलेल्या संध्याला आज्जी सांगते की, "स्रीला खूप कणखर बनावं लागतं. समाजात असणाऱ्या वाईट नजरांना हाणून पडायचं असंल तर स्वतःला स्वतःसाठी उभं राहता यायला पाहिजे.” मेंढारांसाठी गावोगावी करावी लागणारी भटकंती, कुठेही “वाडा” बसवायचा आणि चूल पेटवून रोजच्या भाकरीचा प्रश्न मिटवायचा, असं संध्याचं आयुष्य. पण आपल्या मुलांच्या वाट्याला ही भटकंती येऊ द्यायची नाही असे संध्या मनाशीच ठरवते आणि त्यांना शिक्षणाचा मार्ग दाखवते. यात ती सगळ्या अडचणींशी कशाप्रकारे दोन हात करते हा संघर्ष या कादंबरीत पाहायला मिळतो.
अखेर संध्याच्या संघर्षाचे चीज होते. तिची मुले समाजातील रूढींना न जुमानता शिक्षण घेतात आणि आईचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करतात.
स्त्रीसंघर्ष, शिक्षणाचे महत्त्व आणि जिद्दीच्या विजयाची ही प्रेरणादायी संघर्षगाथा म्हणजेच ‘वाडा’ कादंबरी होय.
– रुपाली काळे/निगडे, कलबूर्गी (गुलबर्गा )
