
सिन्नर – मातोश्री चंद्रभागाबाई व अयोध्याबाई चांडक कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी डॉ.होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.विज्ञान विषयक संकल्पना प्रयोगशीलता व संशोधनात्मक दृष्टिकोन यांचे उत्तम प्रदर्शन करत विद्यार्थिनींनी घवघवीत यश मिळवले.
या स्पर्धा परीक्षेमध्ये इयत्ता सहावीच्या २७ विद्यार्थिनी प्रविष्ट झाल्या,त्यापैकी एकूण १४ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या त्यातील शर्वरी देशमुख,नंदिनी जंगम,आराध्या गोळेसर,आरोही जाधव या विद्यार्थिनींची प्रात्यक्षिक फेरीसाठी निवड झाली आहे.इयत्ता ९ वीच्या ३ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून प्रांजल काळे या विद्यार्थिनीची प्रात्यक्षिक फेरीसाठी निवड झाली आहे.
यशस्वी विद्यार्थिनींचे शालेय समिती अध्यक्ष श्रीराम क्षत्रिय,पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष गोरक्ष सोनवणे,मुख्याध्यापिका सुनिता कर्डिले,पर्यवेक्षिका सुवर्णा सोनवणे यांनी विद्यार्थिनींच्या यशाचे कौतुक करत त्यांना उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या. या यशामुळे इतर विद्यार्थिनींनाही विज्ञान क्षेत्रात करियर करण्याची प्रेरणा मिळाली असून विद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. या स्पर्धा परीक्षेसाठी विज्ञान शिक्षिका अलका वाघ,रेश्मा कडतन, संध्या कुलकर्णी, सुवर्णा दमाले यांचे मार्गदर्शन लाभले. चांडक कन्या विद्यालयातील विद्यार्थिनींचे हे सुयश निश्चितच अभिमानास्पद असून भविष्यातही अशाच प्रकारे त्या विविध स्पर्धांमध्ये यश मिळवतील व्यक्त करण्यात येत आहे.
