
तीन दिवसांत दुसरी घटना; वनविभाग व प्रशासनाकडे ठोस उपाययोजनांची मागणी
चांदवड (प्रतिनिधी , भागवत झाल्टे) चांदवड तालुक्यातील नारायण खेडे शिवारात आज दिनांक 16/12/2025 रोजी दुपारी चारच्या सुमारास एक दुर्दैवी घटना घडली. पाटे येथील श्री. सोमनाथ प्रभाकर चव्हाण यांच्या मालकीच्या गट नंबर 48 मधील विहिरीत तीन हरणे पडून मृत अवस्थेत आढळून आली.
श्री. सोमनाथ चव्हाण हे आपल्या शेतात पाहणी करत असताना विहिरीतील पाण्याची पातळी पाहण्यासाठी गेले असता त्यांना विहिरीत तीन हरणे मृत अवस्थेत दिसून आली. ही बाब लक्षात येताच त्यांनी तात्काळ वन्य पशु प्राणी मित्र श्री. भागवत झाल्टे यांना भ्रमणध्वनीद्वारे माहिती दिली.
त्यानंतर भागवत झाल्टे यांनी त्वरित वनविभागाशी संपर्क साधला.
घटनेची माहिती मिळताच माननीय वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. विशाल व्ही. कुठे यांच्या आदेशान्वये व
वनपाल श्री. वैभव गायकवाड (चांदवड) यांच्या मार्गदर्शनाखाली
श्रीमती सुरेखा बा. मरशिवने मॅडम (वनरक्षक, चांदवड), श्री. भरत वाघ (वनसेवक) तसेच वाहनचालक अशोक शिंदे यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
संध्याकाळच्या सुमारास वनविभागाच्या रेस्क्यू टीमने गावकऱ्यांच्या मदतीने विहिरीत पडलेली तीनही हरणे वरती काढली. मात्र, तोपर्यंत तिन्ही हरणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला होता.
विशेष म्हणजे, चांदवड तालुक्यातील तळेगाव नंतर नारायण खेडे (नारायणगाव) शिवारात अवघ्या तीन दिवसांत ही दुसरी घटना असून, पुन्हा तीन हरणांचा विहिरीत पडून मृत्यू झाला आहे. यामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
घटनास्थळी सोमनाथ चव्हाण, प्रभाकर चव्हाण, गोपीनाथ तरस, नवनाथ तरस, चरण चव्हाण, सोपान चव्हाण, योगेश खागळ आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रशासन व वनविभागाला कळकळीची मागणी
सध्या परिसरात हरणांचे कळप मोठ्या प्रमाणावर फिरत असून, अनेक विहिरी उघड्या व संरक्षक कुंपणाविना असल्याने अशा घटना वारंवार घडत आहेत.
प्रशासन व वनविभागाने यापुढे फक्त पाह्याची भूमिका न घेता तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अन्यथा स्थानिक नागरिक व शेतकरी आंदोलनाचा मार्ग स्वीकारतील, असा इशारा देण्यात येत आहे.
