जळगाव निंबायती – भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी

जळगाव निंबायती (वार्ताहर) – येथील हिंदू मुस्लिम धर्मीयांच्या श्रद्धेचे प्रतीक असलेल्या सुकी नदीच्या तीरावरील चाँदशावली बाबा दर्गाच्या तीन दिवसीय उरुसाची झाली. वर्षानुवर्षे या ठिकाणी फाल्गुन वद्य नवमी, दशमी व एकादशी या तीन दिवसांत मोठा यात्रोत्सव भरतो.
पहिल्या दिवशी गावात वाजतगाजत संदल मिरवणूक काढण्यात आली. परंपरेनुसार येथील पोलिस आऊट पोस्टचे अधिकारी व कर्मचारी यांना पूजेचा पहिला मान देण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक युवराज चव्हाण यांनी दर्गावर चादर चढवली. यात्रा काळात परिसरातील हिंदू, मुस्लिम बांधवांनी दर्गावर नवसाच्या चादरी चढवून सामाजिक व धार्मिक एकतेचा संदेश दिला.

याप्रसंगी सरपंच वाल्ह्याबाई पटांग्रे, उपसरपंच महेंद्र पाटील, दगडू पटांग्रे, पोलीस हवालदार सागर निकम, सागर कुमावत, सुनिल कडन्नोर पोलीस पाटील सुनिल कोरे, युवराज वडक्ते, विलास अहिरे, सुरेश काळे, यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, वि. का. सोसायटी सदस्य, यात्रा कमिटी सदस्य, पंचक्रोशीतील प्रतिष्ठित नागरिक, भाविक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी शेतातील नवधान्यापासून बनविलेला मलिदा तयार करून प्रसादाचे वाटप करण्यात आले. यात्रोत्सवात जिल्हाभरातून आलेल्या अनेक लहान-मोठ्या गृहोपयोगी वस्तूंची दुकाने, छोटे-मोठे रहाट पाळणे, खाद्यपदार्थांचे हॉटेल लहानग्यांसाठी खेळण्यांची दुकाने, आदी थाटण्यात आली होती. यावेळी यावल तालुक्यातील लोककलावंत भिमा-नामा अंजाळेकर यांचा लोकनाट्यांचा कार्यक्रम पार पडला. दर्गाची देखभाल, दिवा बत्तीचे काम मुजावर सरदार पठाण हे अनेक वर्षांपासून करत आहेत. तसेच अशरफ शेख, फिरोज शेख, समीर शेख, येथील व्यवस्था पाहतात. यात्रोत्सवात भाविकांनी श्रद्धा व नवसापोटी चादर चढून मजारचे दर्शन घेतले.

आकर्षण – कुस्त्यांची दंगल –
यात्रेचे आकर्षण म्हणजे एकादशीला रंगणारी कुस्त्यांची दंगल. यंदाच्या वर्षी यात्रेच्या अखेरच्या दिवशी कुस्त्यांचा मोठा फड रंगला. यावेळी परजिल्ह्यातून आलेल्या मल्लांनी दाखविलेले कर्तब, टाकलेले डाव, खेळात वापरलेल्या विविध क्लुप्त्यांनी उपस्थितांची दाद मिळवली. विजेत्यांना रोख रक्कमेची बक्षीसे देऊन गौरविण्यात आले. यात्रेचे दुसरे आकर्षण म्हणजे घोडा व बैल यांच्या शर्यती. न्यायालयाच्या सशर्त परवानगीनुसार यंदा उन्हाचा तडाखा असून देखील यात्रोत्सव टांगा शर्यती पाहण्यासाठी शौकीनांनी मोठी गर्दी केली होती.

