नाशिक:(प्रतिनिधी)- समाज परिवर्तनशील असतो. त्यात नेहमी बदल घडत असतो. आजच्या या परिवर्तनाच्या काळात माणूसपण जपण्याची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी दत्तात्रय दाणी यांनी केले.
गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या वतीने हुतात्मा स्मारकात आयोजित 'पुस्तकावर बोलू काही' या अभिनव उपक्रमात २०१वे पुष्प 'निवडुंग' या पुस्तकावर गुंफताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विडंबनकार संजय आहेर होते.
कवी दाणी पुढे म्हणाले की, परिवर्तनाच्या बदलत्या वाटेवर माणूस माणसापासून दूर जात आहे. माणसा-माणसामधला संवाद हरवत चालला आहे. ही शोकांतिका आहे. माणूस थोड्याशा स्वार्थासाठी व्याभिचारी होत आहे. दगडाने रक्तबंबाळ होत असलेल्या मानवी भावना नष्ट होऊन माणसातली संवेदना जपण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.
योगाचार्य अशोक पाटील आणि डॉ.निशांत गुरू या भाग्यवान श्रोत्यांना ग्रंथभेट देण्यात आली. अलका दराडे यांनी आभार मानले. सुरेश पवार यांनी सूत्रसंचालन केले. दरम्यान येत्या मंगळवारी (२५) ज्येष्ठ कवयित्री सरला सोनजे 'सरल तरंग' या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करणार आहेत.