
नाशिकरोड:-(प्रतिनिधी ) शिखरेवाडी येथील स्वानंद ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या सभागृहात व्यासंगी अभ्यासक डॉ.गजानन होडे यांचे ‘नाशिक जिल्ह्यातील आदिवासी क्रांतिकारकांच्या जीवनगाथा आणि त्यांचे स्वातंत्र्यप्राप्तीसाठी महत्त्वाचे योगदान’ या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान संपन्न झाले.
आपल्या भाषणात त्यांनी नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, बागलाण, नांदगाव, सिन्नर, नांदूरशिंगोटे, त्र्यंबकेश्वर येथील अनेक आदिवासी क्रांतिकारकांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतलेला आहे. यातील अनेक आदिवासी क्रांतिकारकांना अंदमानमध्ये काळ्या पाण्याच्या शिक्षेवर पाठवले होते. आदिवासी क्रांतिकारक यांचे १८५७ च्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदानासंबंधीचा महत्त्वाचा इतिहास उपस्थितांसमोर सांगितला.

तसेच भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आदिवासी क्रांतिकारकांचे योगदान अतुलनीय आहे. आदिवासी महिलांचे योगदानही महत्त्वाचे होते. त्या बाणांच्या टोकाला धार लावून विष लावत असायच्या. तसेच विविध ठिकाणी जाऊन भाकऱ्या बनवून माहिती गोळा करत होत्या, असेही ते म्हणाले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सचिव अविनाश गोसावी, उपसचिव श्रीकांत मोहरील, मेखला रास्वळकर, आधारस्तंभ वसंत उपासनी, सिंधू उपासनी, जयश्री नाईक, उषा गीत, ज्योती जोशी, राम कुलकर्णी, सुधाकर सोनवणे, दत्तात्रय पाटील, अनिल सहस्त्रबुद्धे, प्रदीप भालेराव, प्रकाश भालेराव, मृणाल प्रभुणे, बनसोड यांनी विशेष परिश्रम घेतले.
उपाध्यक्ष सुनंदा गोसावी यांनी अशीच अभ्यासपूर्ण व्याख्याने आयोजित करण्यासंबंधी विचार व्यक्त केले. सुधा डमरे यांनी सूत्रसंचालन करत त्रिवार ओंकार आणि गुरुवंदना म्हणून वातावरण निर्मिती केली. पुढील कार्यक्रमाचे निवेदन सुधा कुलकर्णी यांनी करून आभार मानले.
