दुरावलेल्या वर्गमित्रांनी शालेय जीवनातील आठवणींना दिला उजाळा

*जळगाव निंबायती (वार्ताहर) अनेक वर्षे एकमेकांपासून दूर गेल्यावर माणसाची खरी किंमत कळते. त्यांच्यामधील आपुलकी, प्रेम, जिव्हाळा हे तेव्हाच उमगते. अगदी अशाच प्रसंगास सामोरे जाण्याची वेळ येथील गोविंदराव यशवंतराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयातील वर्गमित्र-मैत्रीणींवर आली. निमित्त होते स्नेहमेळाव्याचे. सन २०१० दहावी व २०१२ मधील बारावी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्याचे आयोजन पाटील कनिष्ठ महाविद्यालयात करण्यात आले होते. दहावी व बारावीच्या परीक्षेनंतर आयुष्याच्या वेगवेगळ्या वाटा शोधण्यासाठी बाहेर पडलेल्या वर्गमित्रांची तब्बल १३ वर्षांनी भेट झाली. या माजी विद्यार्थ्यांचा वर्ग पुन्हा एकदा भरला होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून स्नेहमेळाव्यासाठी एकत्र आलेल्या मित्रांनी १३ वर्षांनंतर शालेय आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सोबत सर्वांच्या जुन्या स्मृती जागृत झाल्या. यावेळी आयोजकांनी सर्वांचे फेटा बांधून व गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. गुरुजनांप्रती आदरभाव व्यक्त करणेकामी प्रवेशद्वारापासून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. औक्षण करत साग्रसंगीत त्यांना सभामंडपापर्यंत नेण्यात आले. पुन्हा एकदा शाळेची घंटा वाजली, आपापल्या वर्गानुसार ओळीने सर्व पटांगणात उभे राहिलेत. प्रार्थना, राष्ट्रगीत झाले. बारावी ‘ब’ वर्गाचा राज्यशास्त्र विषयाचा पहिला तास झाला. पूर्वीचे वर्गशिक्षक प्रा. अमोल अहिरे यांनी उपस्थितांची हजेरी नोंदवली. उशीरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रा. दिपक जमधाडे सरांनी छडी देऊन शिक्षा केली. पूर्वीच्या आपआपल्या बाकावर बसून अध्ययन करतांना अनेकांना गहिवरून आले. स्नेहमिलन सोहळ्याच्या प्रारंभी दिवंगत शिक्षक व विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष वृक्षमित्र स्वर्गीय रोडूआण्णा पाटील यांच्या समाधीस्थळाला पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य पी. एन. पवार होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव महेंद्र पाटील, समन्वयक निंबाजी शिंदे, सरपंच वाल्ह्याबाई पटांग्रे दगडू पटांग्रे होते. समवेत माजी प्राचार्य जी. एस. फसाले, एच. पी. दुकळे, प्रा. पी. जी. माने, डी. के. जगताप, डी. जे. देवरे, डी. एस. जमधाडे, प्रा. अमोल अहिरे, आर. के. शिंदे आदी उपस्थित होते. प्रसंगी गुरुजनांना स्वामी विवेकानंदांची प्रतिमा भेट देण्यात आली. विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या सर्वांनी एकमेकांना वेळोवेळी सहकार्य करावे, एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी व्हावे, भविष्यात पुन्हा-पुन्हा सर्वांनी एकत्र यावे, विद्यालयाच्या विकासासाठी सर्वोतोपरी सहकार्य करावे असा मानस व्यक्त करून सर्वांनी आपला परिचय करून दिला. मनसोक्त गप्पा मारल्या. यावेळी शिक्षकांची भाषणे झालीत. एकत्र आलेल्या विद्यार्थ्यांनी एकमेकांविषयी माहिती दिली. सध्या कोण काय नोकरी, व्यवसाय करतोय, घेतलेले शिक्षण, कुठे वास्तव्यास आहे, आपला परिवार याबाबत सांगितले. यावेळी मिष्टान्नाचा आस्वाद घेत सर्वांनी स्नेहभोजनाचा आनंद लुटला. प्रास्ताविक वैभव थोरात यांनी केले, सूत्रसंचलन करिश्मा मन्सूरी हिने केले, तर आभार सुनिल कोरे यांनी मानलेत. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नवनाथ काळे, अभिषेक निकम, भूषण गायकवाड, बापू दुकळे, महेश नान्नोर, संदिप पाटील, ललित गोराणे, निलेश देवरे, सागर मार्कंड, सागर जगताप, माधुरी कोळपे, प्रतिभा मोरे, शितल रायते, प्रियंका मोरे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

*थट्टा-मस्करीला उधाण –
*शैक्षणिक, वैद्यकीय, प्रशासकीय, अभियांत्रिकी, विधी, संरक्षण, देशसेवा, शेती, उद्योग, व्यवसाय अशा सर्व क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या सर्व जुने मित्र-मैत्रिणींच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. बऱ्याच वर्षांनी जुने मित्र-मैत्रिणी भेटल्याने गप्पा, थट्टा-मस्करीला उधाण आले होते. मित्रांसमवेत सेल्फी काढायला प्रत्येकाची जणू काही चढाओढ लागली होती. विविध शहरांत स्थायिक झालेले गावांतील वर्ग मित्र-मैत्रिणींनी स्नेहमेळाव्याला हजेरी लावली. ४७ माजी विद्यार्थी तसेच ३६ विद्यार्थिनींनी अशा तब्बल ८३ मित्रांनी सहभाग नोंदवल्यामुळे स्नेहमेळाव्याला आगळेवेगळे रूप आले होते.

