
नाशिक:-( प्रतिनिधी )आपल्या आयुष्यावर संस्कारांचा मोठा प्रभाव असतो. या संस्कारांतून लेखनाची निर्मिती होते. आत्म्याचे प्रतिबिंब म्हणजे ‘दिसामाजी’ ची जन्मकथा आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार डॉ.प्रशांत भरवीरकर यांनी केले. गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त हुतात्मा स्मारक येथे आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही…’ या उपक्रमात ‘दिसामाजी’ या पुस्तकावर ते बोलत होते. मुक्ता चिंधडे अध्यक्षस्थानी होत्या. भरवीरकर पुढे म्हणाले की, आयुष्यात अनेक अनुभव गाठीशी असताना संस्कारूपी अनुभवांचा पाया मोठा असावा लागतो. विविध अनुभवसिद्ध व्यक्तिमत्त्वांचा लेखाजोगा मांडताना विविध प्रतिबिंबं मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला, असेही ते म्हणाले. सुभाष पवार आणि आनंद आहिरे या भाग्यवान विजेत्यांना ग्रंथभेट देण्यात आली. सुरेश पवार यांनी सूत्रसंचालन केले तर श्रीकांत बेणी यांनी आभार मानले. दरम्यान येत्या शुक्रवारी (दि.२८) ज्येष्ठ साहित्यिक देवीदास खडताळे हे ‘मनाचे कंगोरे’ या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करणार आहेत.



