
नाशिक:-(प्रतिनिधी ) जानेवारीत सातारा येथे संपन्न होणाऱ्या अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांचा मंगळवारी (दि.१८) नाशिकमध्ये सत्कार होणार आहे.
सावानाच्या ग्रंथालयभूषण मु.शं.औरंगाबादकर सभागृहात सायंकाळी ५.३० वाजता संपन्न होणाऱ्या सोहळ्याचे आयोजन सार्वजनिक वाचनालय, अ.भा.मराठी प्रकाशक संघाची नाशिक शाखा आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेची जलालपूर शाखा यांच्या वतीने करण्यात आले आहे. अ.भा.मराठी प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणाऱ्या सत्कार सोहळ्यास सावानाचे अध्यक्ष प्रा.दिलीप फडके, प्रकाशक संघाच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष विलास पोतदार, मसाप शाखा जलालपूरचे कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर उपस्थित राहणार आहेत.
सत्कार सोहळ्यापूर्वी नाशिक जिल्ह्यातील ज्येष्ठ कवी विठ्ठल संधान, सोमनाथ साखरे, अरुण इंगळे, पंकजकुमार गवळी, जी.पी.खैरनार या निमंत्रित कवींचे बहारदार कविसंमेलन संपन्न होणार आहे. त्याचे सूत्रसंचालन विडंबनकार संजय आहेर करतील.
सत्कार सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन सार्वजनिक वाचनालयाचे पदाधिकारी, अ.भा.मराठी प्रकाशक संघाची नाशिक शाखा आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, जलालपूर शाखेने केले आहे.
