
जळगाव निंबायती (वार्ताहर) – येथील अहिल्यादेवी शिक्षण संस्थेच्या गोविंदराव यशवंतराव पाटील विद्यालयात स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या १३६ व्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांनी प्रतिमेचे पूजन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य पी. एन. पवार होते, समवेत संस्थेचे सचिव महेंद्र पाटील, समन्वयक निंबाजी शिंदे, पर्यवेक्षक व्ही. डी. काळे, सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारींसह बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
प्रसंगी विद्यार्थ्यांची भाषणे झालीत. बालदिनाचे औचित्य साधून शिक्षकांनी मुलांना गुलाबपुष्प देऊन त्यांचा सत्कार केला. पंडित नेहरूंचे मुलांवरील अफाट प्रेम होते तसेच त्यांना मुले प्रिय होती हे लक्षात घेऊन त्यांचा जन्मदिवस संपूर्ण भारतात बालदिन म्हणून साजरा केला जातो. त्यांना वाटत होते की मुले म्हणजे देशाचे भविष्य आहेत आणि त्यांचे बालपण जितके सुंदर असेल, तितके देशाचे भविष्यही उज्ज्वल बनेल. नेहरु हे एक द्रष्टे नेते होते. त्यांनी मुलांच्या न्याय हक्कासाठी, शिक्षणासाठी आणि कल्याणासाठी विविध योजना राबविल्यात असे प्रतिपादन प्राचार्य पवार यांनी यावेळी बोलताना केले. सूत्रसंचालन जेष्ठ शिक्षक डी. के. जगताप यांनी केले तर आभार आर. जे. जाधव यांनी मानलेत.
