
सिन्नर (प्रतिनिधी)११ नोव्हेंबर २०२५आद्यक्रांतीवीर भागोजी नाईक यांच्या स्मृतीदिनानिमित्त महामित्र परिवार व आद्यक्रांतीकारक राघोजी ब्रिगेड च्या वतीने सिन्नर येथील क्रांतीस्थळ येथे त्यांना अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाची सुरुवात आद्यक्रांतिकारक भागोजी नाईक, आद्यक्रांतीकारक उमाजी नाईक, आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांच्या शिल्पास पुष्पहार घालून करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे म्हणाले की, आद्यक्रांतीवीर भागोजी नाईक यांना ब्रिटिशांनी नगर येथे पोलिस अधिकारी म्हणून नोकरीला घेतले होते.स्वातंत्र्य मिळवण्यासाठी महादेव कोळी, भिल्ल बांधवांनी ब्रिटिशांविरुद्ध बंड पुकारले होते.त्या बंडाला क्रांतीवीर भागोजी नाईक यांची साथ आहे या संशयावरून त्यांना एक वर्षाची शिक्षा ठोठावून बडतर्फ करण्यात आले.

.तुरूंगातून बाहेर आल्यावर त्यांनी स्वातंत्र्याच्या क्रांतीबंडात उडी घेतली.व ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडले.क्रांतीवीर भागोजी नाईक यांचं बंड मोडून काढण्यासाठी नगरचा पोलिस सुप्रीटेंडेंट जे.डब्ल्यू.हेंड्री आपल्या फौजफाट्यासह नांदूरशिंगोटे येथे आला तेथिल डोंगरावर घाटामध्ये समोरासमोर लढाई होऊन त्यामध्ये क्रांतीवीर भागोजी नाईक यांनी हेंड्रीला ठार केले.या घटनेमुळे ब्रिटिशांना हादरा बसला व महादेव कोळी, भिल्ल बंडकऱ्यांमध्ये उत्साह निर्माण झाला.मग खवळलेल्या ब्रिटिशांनी बंड मोडीत काढायला सुरुवात केली वीर भागोजींचा भाऊ व मुलगा यशवंत हे ब्रिटिश अधिकारी कॅ.नूताल च्या विरुद्ध झालेल्या लढाईत धारातीर्थी पडले.वीर भागोजी नाईक खचून न जाता बंड चालूच ठेवले.वीर भागोजींना हरवण्यासाठी ब्रिटिशांनी रणनीती आखली मेजर फ्रॅक्साचर च्या नेतृत्वाखाली जागोजागी गुप्तहेर पेरले गेले.वेगवेगळी आमिषे दाखवून फितुरी मुळे आदिवासी वीरांचा पराभव होऊ लागला.वीर भागोजी नाईक व त्यांचे साथीदार हे सिन्नर येथील मिठसागरेच्या डोंगराखाली मुक्कामी असल्याची बातमी गुप्तहेरांनी दिली.ब्रिटिशांनी वीर भागोजींच्या सैन्याची नाकेबंदी केली.मिठसागरेच्या रानामध्ये ब्रिटिश आणि वीर भागोजी नाईक यांच्या सैन्यामध्ये लढाई झाली त्या रानाला लढाई चं रान म्हणतात.त्यामध्ये ब्रिटिशांनी केलेल्या गोळीबारात वीर भागोजींसह अनेक साथीदार मारले गेले.क्रांतीवीर भागोजी नाईक हे देशासाठी शहीद झाले.त्यांची समाधी नांदूरशिंगोटे पासून एक मैलावर आहे.अशा या महानायकास विनम्र अभिवादन!
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाऊसाहेब ढागळे,प्रास्ताविक विजय मुठे तर रुपेश मुठे यांनी आभार मानले.
यावेळी महामित्र दत्ता वायचळे, आद्यक्रांतीकारक राघोजी ब्रिगेड चे सहसंस्थापक विजय मुठे, माजी नगरसेवक रूपेशभाऊ मुठे, निलेश गाडवे
सुरज ढगळे, नवनाथ शिरसाठ भाऊसाहेब ढोनर,रोहित मुठे, प्रकाश मदगे लक्ष्मण तळपे,प्रकाश गुंजाळ आकाश धोंगडे योगेश मोरे आदी उपस्थित होते.
