
जळगाव निंबायती (वार्ताहर) – जगाला शिक्षण हे केवळ प्रमाणपत्र नव्हे, तर विकासाचे, परिवर्तनाचे आणि मुक्तीचे साधन आहे हा संदेश देणारे, ‘शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे’ असे सांगून समाजात क्रांतीची मशाल प्रज्वलित करणारे, ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ ही घोषणा केवळ शब्द नाही, तर स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या तत्वांची तेजस्वी ज्योत आहे. अशी शिकवण देणार्या महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळेचा पहिला दिवस ७ नोव्हेंबर प्रत्येक विद्यार्थ्याला नव्या प्रेरणेचा संदेश देतो. असे प्रतिपादन जेष्ठ शिक्षक डी. के. जगताप यांनी केले ते अहिल्यादेवी शिक्षण संस्थेच्या गोविंदराव यशवंतराव पाटील विद्यालयात आयोजित विद्यार्थी दिवस कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य पी. एन. पवार होते.
प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव महेंद्र पाटील, समन्वयक निंबाजी शिंदे, पर्यवेक्षक व्ही. डी. काळे, सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारींसह बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांची भाषणे झालीत. सूत्रसंचालन नरेंद्र अहिरे यांनी केले तर आभार एम. के. पोलगीर यांनी मानलेत.
