
भालूर (सोमनाथ तळेकर) भालूर: शेतकरी हा नेहमीच भविष्य काळावर जगत असतो वर्तमानात राब राब राबून भविष्यात हातात काय मिळणार याची शाश्वती त्याला कधीच नसते. उत्पन्नाची कोणतीही हमी नसल्याने त्याला आपल्या छातीवर दगड ठेऊनच भविष्याची स्वप्न पाहण्याची वेळ येते. लहरी हवामानामुळे आता कोणत्याही हंगामाचा भरवसा राहिलेला नाही. यावर्षी तर अगोदर अतिवृष्टी आणि नंतर अवकाळी यामुळे शेतीचे पूर्णतः नुकसान झाले. या संकटातूनही काही जिद्दी शेतकऱ्यांनी आपली पिके वाचविण्यासाठी धडपड केली मात्र निसर्गाचा कोप काय असतो हे वेळोवेळी निसर्गाने दाखवूनही दिले आहे.आणि मग शेतकऱ्यांसमोर हतबल होण्याशिवाय कोणताही पर्याय नसतो.
असाच प्रकार रायपुर येथील शेतकरी पुंडलिक निकम यांच्या बाबतीत घडला. त्यांनी आपल्या शेतात गट नंबर २३७ मध्ये तब्बल दोन एकर क्षेत्रावर कांदा पिकाची लागवड केली होती. अतिवृष्टीतून त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून पिक वाचविले मात्र नंतर झालेल्या अवकाळी पावसाने शेतात सगळीकडे पाणीच पाणी झाल्याने परिणामी पिक वाचविण्याचा कोणताही पर्याय समोर नसल्याने त्यांना जीवाचे रान करून वाचविलेल्या पिकावर काल रोटाव्हेटर फिरविण्याची वेळ आली. शेताची मशागत, कांदा बियाणे, लागवडीची मजुरी आणि पिक वाचविण्यासाठी केलेला औषधांचा आणि फवारणीचा खर्च पूर्णतः वाया गेल्याने नफा तर नाहीच परंतु कर्जबाजारी होण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
बियाणे खते कीटकनाशके मजुरीचा वाढलेला दर यामुळे शेतीचा उत्पादन खर्च वाढलेला असताना सरकार मात्र तुटपुंजी मदत करून शेतकऱ्यांची थट्टा करत आहे. सरकारने वेळीच शेतकऱ्यांना सावरले नाही तर एक दिवस असा येईल कि पूर्ण शेती व्यवसाय संकटात असेल त्यामुळे सरकारने उत्पादन खर्चाचा विचार करून जास्तीत जास्त मदत द्यावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
दिवस रात्र कष्ट करून सतत फवारणी करून मी कांदा पिक वाचविण्याचा प्रयत्न केला होता परंतु अवकाळी पावसाने शेतात पाणी साचून राहिल्याने वाचविलेला कांदा पूर्णतः सडून गेला आणि पर्यायाने हतबल होऊन उभ्या पिकावर रोटाव्हेटर चालविण्याची वेळ आली. पुंडलिक निकम शेतकरी रायपुर
