
सिन्नर (प्रतिनिधी ) ८ नोव्हेबर २०२५ आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या २२० वी जयंती साजरी करण्यात आली
सिन्नर शहरातील तहसील कार्यालया समोरील क्रांतिस्थळावरील आद्य क्रांतिकारक उमाजीराजे नाईक, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे व आद्य क्रांतिकारक भागोजी नाईक ह्या महापुरुषांच्या त्रिशिल्प स्थळी सिन्नर तालुक्यातील समविचारी संघटना एकत्रित येऊन आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या २२० व्या जयंती सोहळ्या निमित्ताने आद्य क्रांतिकारक उमाजीराजे नाईक, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे व आद्य क्रांतिकारक भागोजी नाईक, यांच्या त्रिशिल्पाला पुष्पहार आर्पण करण्यात आले.
यावेळी महामित्र दत्ता वायचळे,काॅम्रेड हरिभाऊ तांबे,आर टी जाधव, रुपेश मुठे, विजय मुठे, प्रकाश मदगे दत्तात्रेय आचार्य यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध क्रांतिकारक आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील देवगाव (ता. अकोले) येथे रामजी व रमाबाई या दाम्पत्यापोटी महादेव कोळी जमातीत झाला. रामजी हे महादेव कोळी साम्राज्य असलेल्या जव्हारच्या मुकणे संस्थानच्या राजूर प्रांताचे सुभेदार होते. रामजी यांनी राघोजींना घरी शिक्षणाची व्यवस्था केली. पुढे राघोजी तलवारबाजी, भालाफेक, पट्टा चालविणे, बंदुकीने निशाणा साधणे, घोडेस्वारी करणे यांत तरबेज होते.
राघोजींचे संघटन कौशल्य चांगले होते. त्यांना मुळा खोरे, चाळीसगाव डांगाण, बारागाव पठार या परिसरातून विविध जातीजमातीचे अनेक तरुण येऊन मिळाले. अन्यायी अत्याचारी सरकार, सावकार, जमीनदार यांच्या विरोधात आवाज उठविण्याचे काम राघोजींच्या नेतृत्वाखाली सुरू झाले. राया ठाकर, देवजी आव्हाड हे त्यांचे सहकारी. पुढे त्यांनी कोतुळ राजूर व खीरवीरे परिसरातील जुलमी व अत्याचारी सावकारांवर धाडी टाकल्या. त्याची संपत्ती लुटून गोरगरिबांना वाटून टाकली, तसेच सावकारांनी कब्जा केलेल्या जमिनींचे सर्व कागद व दस्तऐवज यांची होळी केली. महिलांवर हात टाकणाऱ्या सावकारांचे कान, नाक कापले. राघोजींच्या वाढत्या दबदब्यामुळे या भागातील सावकार व जमीनदार आपले सर्व अधिकार सोडून अकोले व संगमनेर परिसरात गेले. पुढे राघोजींनी सावकारशाही विरोधातील लढा अधिक व्यापक करत नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, पेठ, कळवण येथील सावकारशाहीविरुद्ध संघर्ष केला.
देशाच्या स्वातंत्र्य युद्धात व अन्याय आत्याचारा विरुद्धच्या लढ्यात राघोजी भांगरे यांचे खूप मोठे योगदान होते अशा क्रांतिकारकास विनम्र अभिवादन..
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे होते सूत्रसंचालन लक्ष्मण तळपे यांनी केले व प्रास्थाविक विजय मुठे यांनी केले तर आभार शाम कुंदे यांनी मानले.
या कार्यक्रमास महामित्र दत्ता वायचळे, काॅम्रेड हरिभाऊ तांबे, मा.नगरसेवक रुपेश मुठे, आद्यक्रांतीकारक राघोजी ब्रिगेड चे विजय मुठे, अ.भा.आदिवासी विकास परिषद सिन्नरचे अध्यक्ष प्रकाश मदगे, प्रवक्ते लक्ष्मण तळपे,शेतकरी संघटनेचे आर टी जाधव, दत्तात्रेय आचार्य, शाम कुंदे, सुनिल निचळ, किरण मुठे, आदी समाज बांधव उपस्थित होते.
