
नाशिक:(प्रतिनिधी)- विषमतेवर भाष्य करताना आधुनिक तत्त्वज्ञानासाठी केलेला संघर्ष शब्दात मांडता आला पाहिजे, असे प्रतिपादन कवी रविकांत शार्दुल यांनी केले.
गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त हुतात्मा स्मारक येथे आयोजित पुस्तकावर बोलू काही या अभिनव उपक्रमात १९७वे पुष्प गुंफताना "गवसले आकाश नवे" या पुस्तकावर ऐसपैस करत होते. अध्यक्षस्थानी कवी शिवाजी ठाकरे होते.
कवी शार्दुल पुढे म्हणाले की, संग्रहाची निर्मिती केवळ वेगवेगळ्या क्षेत्रातील कर्तृत्ववान आणि समाज घडवणाऱ्या, आयुष्याच्या लढाईत वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या भेटलेल्या माणसांच्या भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला आहे. अतिशय साध्यासोप्या आणि वेगवेगळ्या विषयांवरील कविता वास्तवाचं बोट धरून लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. माणसातला माणूस म्हणून समतेचा मार्ग मिळवून देणाऱ्या अनेक महामानव, समाज सुधारक, क्रांतिकारक, शहिदांसह सामान्य कार्यकर्त्यांच्या विषयाला अनुसरून कवितांची मांडणी करण्यात आली आहे. समाज प्रबोधनाची चळवळ गतिमान व्हावी आणि परिवर्तनाची व प्रकाशाचे नवी पहाट अशा साहित्यामधून निर्माण व्हावी, हा उदात्त हेतू या कवितासंग्रहामध्ये आहे, असेही ते म्हणाले.
प्रा.तेजस्विनी कदम आणि रवींद्र दळवी या भाग्यवान विजेत्यांना ग्रंथभेट देऊन सन्मानित करण्यात आले.
निशांत गुरू यांनी आभार मानले. सुरेश पवार यांनी सूत्रसंचालन केले. दरम्यान येत्या मंगळवारी (११) प्राचार्य मानसी देशमुख ‘सृजन-संवाद’ या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करणार आहेत.
