नाशिकरोड:(प्रतिनिधी)- बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी १८७५ साली लिहिलेल्या 'वंदे मातरम' या गीताच्या दीडशे वर्षपूर्तीनिमित्त आणि डॉ.आंबेडकर यांच्या शाळाप्रवेश दिनानिमित्त 'विद्यार्थी दिवस' नासाका विद्यालयात साजरा करण्यात आला.
पळसे येथील नाशिक सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील माध्यमिक विद्यालयात नासाकाचे अवसायक प्रदीप आव्हाड आणि नाशिक सर्व सेवाभावी ट्रस्टचे मानद व्यवस्थापक सुधाकर गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.
प्रारंभी विद्यालयाचे मुख्याध्यापक अरुण पगार यांच्यासह विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या प्रमुख उपस्थितीत 'वंदे मातरम' गीताचे तालासुरात गायन करण्यात आले. विद्यार्थी दिवसानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. शिक्षक रवींद्र मालुंजकर यांनी आपले विचार मांडले.
'वंदे मातरम' या विषयावर आयोजित निबंध स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पाचवी-सहावी गटातील मग सृष्टी महेश आडके, प्रियंका प्रमोद काजळे, सर्वेश रवींद्र गायधनी, ईश्वरी शरद गायधनी, धनश्री निलेश मोरे, सातवी-आठवी गटातील खुशी सूर्यभान सानप, श्रीरंग नवनाथ मुंजे, ईश्वरी एकनाथ आडके, समीक्षा संपत शिरोळे, धन्वंतरी दयाराम गायधनी, आरुषी सुदर्शन धांडे आणि नववी-दहावी गटातील कार्तिकी शिवाजी गायधनी, साक्षी दत्ता मोरे, मानसी सचिन आडके, श्रवण गणेश आडके, पूजा अनिल मुठाळ या विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. सांस्कृतिक विभाग प्रमुख कैलास लहांगे यांनी आभार मानले.