
विद्यार्थ्यांच्या मनामनात ज्ञानाचा प्रकाश पेरणारे आणि इंग्रजी विषयाला आत्मीयतेचा स्पर्श देणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे कैलासवासी काशिनाथ हरी सावकार सर. अध्यापन म्हणजे त्यांच्यासाठी केवळ व्यवसाय नव्हता, तर तो त्यांच्या श्वासात मिसळलेला जीवनधर्म होता.
सदैव ज्ञानाची उपासना करणारे सावकार सर आयुष्यभर विद्यार्थ्यांना ज्ञानदान करत राहिले — आणि नियतीनेही जणू त्यांना त्याच कर्माशी एकरूप करून घेतले.
24 ऑक्टोबर 2025 रोजी सन 2000 च्या बॅचने आयोजित केलेल्या गेट-टुगेदर कार्यक्रमासाठी ते इंदिरा माध्यमिक विद्यालय, खिरमाणी (ता. बागलाण, जि. नाशिक) येथे गेले होते. जुन्या आठवणींना उजाळा देत असताना विद्यार्थ्यांबरोबर हसत-गप्पा मारत असताना भाषणाच्या दरम्यान त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. दोन दिवसांच्या उपचारांनंतर, 26 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी त्यांच्या ज्ञानज्योतीने अखेरचा प्रकाश सोडला. शिक्षकाच्या रूपाने सुरुवात झालेला त्यांचा प्रवास शेवटच्या श्वासापर्यंत विद्यार्थ्यांच्या सहवासातच संपला — आणि हेच त्यांच्या आयुष्याचे खरे यश ठरले.
विधायक कार्य समिती, सटाणा या संस्थेत कार्यरत असताना त्यांनी अनेक शाळांमध्ये आपली सेवा दिली. ज्या गावात बदली झाली, त्या गावाला त्यांनी आपले मानले. विद्यार्थ्यांचे हित हेच त्यांचे ध्येय होते. इंग्रजीसारखा विषय त्यांनी विनोदी व प्रेरक पद्धतीने शिकवला. त्यांचा इंग्रजीचा तास म्हणजे एक पर्वणीच असायची. इंग्रजी विषय शिकवताना ते केवळ धडे शिकवत नसत, तर विद्यार्थ्यांना विचार करायला, जग बघायला आणि योग्य मूल्यांची जाण करून द्यायचे. त्यांच्या वर्गात शिकवणीसोबत हास्य, विनोद आणि प्रेरणा यांचा सुंदर संगम असे. “पाठ्यपुस्तक हे सुरुवात असते, पण खरे शिक्षण त्यापलीकडे असते” हे त्यांचे तत्वज्ञान होते. म्हणूनच त्यांनी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांपलीकडील वाचनाची गोडी लावली. माझ्यासारख्या विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा वृद्धिंगत करण्यासाठी संदर्भग्रंथ व इतर वाचन साहित्य उपलब्ध करून दिले. माध्यमिक शिक्षण संपल्यानंतर देखील आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जेव्हा जेव्हा सर भेटत तेव्हा नेहमीच आपुलकीने, प्रेमाने, मायेने माझ्याबरोबरच कुटुंबियांची चौकशी करत. त्यांची प्रत्येक भेट प्रचंड प्रेरणा व आधार देऊन जात असे. आपल्या विद्यार्थ्यांचे प्रगती पाहून सर मनोमन खुश होऊन जात असत.
जोरण (ता. बागलाण, जि. नाशिक) हे त्यांचे मूळ गाव असले, तरी त्यांच्या कार्यातून ते असंख्य गावांचे आणि शहरांचे झाले. त्यांनी घडविलेले विद्यार्थी आज विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत.
सावकार सर केवळ शिक्षक नव्हते — ते संस्कारांचे शिल्पकार होते. त्यांनी विद्यार्थ्यांत माणुसकी, विनम्रता आणि ज्ञानाची ओढ निर्माण केली. सरांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे तेजस्वी दीपस्तंभ — जो स्वतः जळत राहिला पण असंख्य विद्यार्थ्यांच्या आयुष्यात प्रकाश पेरत राहिला.
त्यांचा ज्ञानदीप आज विझला असला तरी, त्या दीपातून पसरलेला उजेड आजही हजारो विद्यार्थ्यांच्या जीवनात प्रकाश देत आहे. सावकार सरांसारखे शिक्षक दुर्मिळच. त्यांची शिकवण, त्यांचे विचार आणि विद्यार्थ्यांवरील त्यांचे अपार प्रेम हे आमच्या हृदयात सदैव जिवंत राहील.
सावकार सरांना भावपूर्ण श्रद्धांजली…
✍🏻 शब्दांकन – सुनिल मांडवडे 7350872572
