
शिक्षकांसाठी आर्थिक साक्षरता कार्यक्रमात बोलताना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे उच्चपदस्थ अधिकारी विशाल गोंडके
पिंपळगाव बसवंत ( प्रतिनिधी )केवळ लिहिण्या वाचण्यापूर्ती साक्षरता महत्त्वाची नसून आर्थिक साक्षरता आणि जागरूकता महत्त्वाची आहे, म्हणून उमलत्या वयातच विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक व्यवहारांची जाण निर्माण झाली पाहिजे. यासाठी शिक्षकांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत असे प्रतिपादन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे उच्चपदस्थ अधिकारी विशाल गोंडके यांनी केले. रिझर्व्ह बँकेच्या फायनान्शिअल इंक्लुजन अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट, मुंबई क्षेत्रीय कार्यालयामार्फत पिंपळगाव ब. येथील अचीवर्स युनिव्हर्सल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षकांसाठी आयोजित आर्थिक साक्षरता कार्यशाळेत ते बोलत होते.
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या कार्यपद्धतीबद्दल माहिती देतानाच विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण होणाऱ्या विविध आर्थिक प्रश्नांची या कार्यशाळेत चर्चा व उकल करण्यात आली. आर्थिक व्यवहार करताना घ्यावयाची काळजी, आर्थिक घोटाळ्यांपासून कसे दूर रहावे, नव्याने होत असलेल्या डिजिटल फ्रॉड पासून स्वतःला सुरक्षित कसे ठेवावे, शैक्षणिक कर्जाबाबत रिझर्व्ह बँकेची भूमिका यासारख्या अनेक प्रश्नांवर वक्त्यांनी सविस्तर मत मांडले. यापसंगी श्री संकल्पना फाउंडेशनचे संस्थापक श्री गणेश खोडे, सचिव सौ. सोनाली खोडे, संचालक श्री. योगेश विधाते, संस्थेचे सीइओ श्री. वैभव पाटील, महाराष्ट्र बँकेचे लीड्स डेव्हलपमेंट ऑफिसर श्री. भिवा लवटे साहेब हेही उपस्थित होते. कार्यशाळेत सहभागी शिक्षकांना रिझर्व्ह बँकेतर्फे एक खास भेटवस्तू सप्रेम भेट देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य राजेश्वर शेळके यांनी केले, सूत्रसंचालन सौ. रूपाली सुगंधी तर आभार प्रदर्शन श्री पाटील यांनी केले.
